शिवपुत्र संभाजी महानाट्याचा राजकारणाशी संबंध नाही!: आमदार नीलेश लंके, मी माझे..



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर  - शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न  आहे.या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आमदार नीलेश लंके यांनी ठामपणे सांगितले.खा. अमोल कोल्हे व माझे मैत्रीचे संबंध आहेत. महानाट्याच्या आयोजनाबाबत वर्षभरापासून चर्चा सुरू होती.

महानाट्याच्या खर्चाबाबत कोल्हे यांच्याशी चर्चा झालेली नाही. सेटअप,ध्वनीक्षेपन यंत्रणा त्यांचीच असून त्यांनी ती इकडे पाठविली असल्याचे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

     शुक्रवारी, दि.१ मार्चपासून शिवपुत्र संभाजी या महानाट्यास प्रारंभ होणार असून त्या पार्श्‍वभुमीवर आमदार लंके यांनी गुरूवारी कार्यक्रमस्थळी पत्रकारांशी संवाद साधला.  

     आमदार लंके म्हणाले की,सध्या विविध समाजात तेढ,वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

जातीयवाद केला जात आहे. चुकीच्या पध्दतीने समाजाला भरकटविले जात आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा तसेच शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये.  

     आतापर्यंत ११ लाख लोकांपर्यंत महानाट्याच्या प्रवेशिका पोहोच करण्यात आल्या आहेत.त्यासाठी प्रतिष्ठानच्या पाच हजार कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.विशेषत: दक्षिणेतील तालुक्यातील घराघरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी प्रवेशिका पोहोचवल्या.



जिल्ह्यातील विविध तालुक्यांनुसार महानाट्याचे नियोजन करण्यात आले असून त्या नियोजनाप्रमाणेच प्रवेशिकांवर तारखा असल्याचे लंके म्हणाले.प्रवेशिकांवर छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्र आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पावित्र जपण्याची काळजीही घेण्यात येत आहे. प्रत्येकाला सन्मानाने प्रवेशिका दिल्या जात असल्याचे आमदार लंके म्हणाले.

नगर शहरासाठी चार दिवसांचे नियोजन  

नगर शहरासाठी चार दिवसांचे नियोजन करण्यात आले असून बैठक व्यवस्था कोलमडू नये म्हणून दररोज ठराविक प्रभागांसाठी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे.

नीलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार

नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.माझे नाव असले तरी प्रतिष्ठाण स्वयंसेवी भूमिका पार पाडत आहे. उद्या कोणी आरोपही करू शकते की हे कसे चालले आहे. प्रतिष्ठाण ही सामाजिक संस्था आहे. याच प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आम्ही कोरोना काळात ३३ हजार रूग्णांना उपचार दिले. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आठ हजार सायकलचे वितरण करण्यात आले. आरोग्य अथवा सामाजिक कामांमध्ये तसेच २०० ते २२५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या प्रतिष्ठाणच्या वतीने मदत करण्यात येते. प्रतिष्ठाण कोणत्याही मतदारसंघापुरते काम करत नाही. कालच धाराशीवच्या विद्यार्थ्याची फी भरण्यात आल्याचेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले.  

चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवितात  

कोरोना काळात आम्ही कोव्हीड सेंटरचे काम केले. या कामाची चौकशी लावण्याचाही काही महाभागांनी प्रयत्न केला. आमचे काम पारदर्शी असल्याने त्यात काही निष्पन्न होण्याचा प्रश्‍नच नव्हता. चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवतात.त्याचा विचार न करता पुढे जायचे असते. एकदा ठेच लागल्यानंतर माणूस शहाणा होतो असे लंके म्हणाले.  

कोण काय करतो याचा विचार करत नाही  

खासदार डॉ. सुजय विखे यांनीही दक्षिण नगर जिल्हयात सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा काही परिणाम या महानाट्यावर होईल का असे विचारले असता आ. लंके म्हणाले कोण काय करतो याचा मी विचार करत नाही. समाजाला जे अभिप्रेत आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे लंके म्हणाले.

कलाकार ते कार्यकारी निर्माता

नगर शहरात बारा वर्षापूर्वी शिवपुत्र संभाजी या महानाटयात स्थानिक कलाकार म्हणून काम केलेले शैलेश सुधीर थोरात आज शिवपुत्र संभाजी या महानाटयाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहत आहेत. जिद्द, चिकाटी,कष्ट, सचोटीच्या जोरावर शैलेश आज नावारूपास येत असून नगर शहरात त्याची चर्चा होत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post