शहरातील मुलांच्या भवितव्यासाठी सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज - किरण काळे
माय नगर वेब टीम
अहमदनगर : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालया जवळ गांधी मैदानातील सुलभ शौचालयाला लागून असणाऱ्या मटका अड्ड्याचे स्वतः वेशांतर करत फेसबूक लाईव्हव्दारे स्टिंग ऑपरेशन केले. यासाठी काळेंनी पायजमा, शर्ट, टोपी असा ग्रामीण पेहराव करत कल्याण बाजारावर मटका लावला. त्याची पावती देखील मटका चालकाकडून घेतली. आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी तोंडाला पंचा गुंडाळला होता. हा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद झाला असून समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल होत आहे.
मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी शहरातील सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काळे यांनी केले. यावेळी काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी "मी हेरंब कुलकर्णी" असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत मुलांचे भवितव्य खराब करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पोलीस व मनपा प्रशासनाचा निषेध केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांच्या टपऱ्या हटवण्याच्या तक्रारीवरून भ्याड हल्ला झाला होता. काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांची बुधवारी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानतंर गुरुवारी दुपारी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी मार्कंडेय शाळेच्या प्रवेशद्वारापासून मटक्याच्या टपरीपर्यंतचे अंतर टेपने मोजले असतात ते केवळ ३० मीटर भरले. केंद्र शासनाच्या २००३ च्या कायद्यानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या २०११ च्या जीआर नुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या आतमध्ये अवैध धंद्यांना अटकाव करण्यात आला आहे.
हे अंतर मोजल्या नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना रेड करण्याची मागणी काळेंनी केली. उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने वराती मागून घोडे दामटत छापा टाकला. यावेळी काळे यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. पोलीसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देखील तातडीने सदर मटक्याच्या अतिक्रमित टपरीवर कारवाईची मागणी काळेंनी फोनव्दारे केली.
पन्नास रुपयाला गंडा घालण्याचा प्रयत्न :
काळे यांनी मटक्याचे नंबर सांगत २२५ रुपये लावले. त्यासाठी ५०० रुपये मटका चालकाला दिले. त्याने मात्र परत २२५ रुपयेच दिले. यातही ५० रुपयांना गंडा घालण्याचा प्रयत्न मटका चालकाने केल्याचे काळेंनी सांगितले.
दरम्यान कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर टपऱ्या गायब झाल्या. मात्र जवळच्याच शंभर मीटरच्या आतील गाळ्यामध्ये हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची कुजबूज परिसरामध्ये आहे. पोलिसांनी याचा शोध घेत पुन्हा तिथे व्यवसाय सुरू होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
शालेय, महाविद्यालयीन पिढी बरबादीच्या वाटेवर :
नगर शहर बकाल झाले आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. आता याला शाळा, महाविद्यालयांचा परिसर सुद्धा अपवाद राहिलेला नाही. पालकांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची चिंता भेडसावत आहे. ग्लोबल युथ तंबाखू सर्व्हेनुसार भारतात १३ ते १५ वयोगटातील १४% पेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात ही सवय लागल्याने ती नंतर सुटत नाही. भारतात दरवर्षी पाच लाख विद्यार्थी व्यसनाधीन बनतात. मुलांचे संरक्षण समाजाला करता येत नसेल तर त्या समाजाला प्रगत समाज म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांना व युवा पिढीला वाचविणे ही समाज, पालक, शिक्षक, प्रशासन आणि शासन यांची एकत्रित जबाबदारी आहे. यात आपण चुकल्यास शहरातील ही पिढी बरबादीच्या वाटेवर अशीच वाहवत जाईल अशी चिंता यावेळी काळेंनी व्यक्त केली.
पोलीस, मनपा प्रशासनाने आता तरी जागे व्हावे :
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणानंतर ही पोलीस व मनपा प्रशासन जागे व्हायला तयार नाही. आजही शाळा, महाविद्यालयांच्या आवारामध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे तरुण पिढी मटका, बिंगो, सोरट, आयपीएल सट्टा यामध्ये बरबाद होत आहे. अनेकांची आयुष्य उध्वस्त होत आहेत. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. अन्यथा काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असा इशारा यावेळी काळेंनी दिला.
काँग्रेस राबवणार जनजागृती अभियान :
दरम्यान, काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने मार्कंडेय विद्यालयाच्या शालेय प्रशासनाची भेट घेत शासनाच्या परिपत्रकाची प्रत भेट देऊन चर्चा केली आली. जीआर मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेपासून शंभर मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंदी बाबतचे फलक लावण्याची विनंती. शाळा प्रशासनाने देखील याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने दिला. पुढील पंधरा दिवसांमध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या प्रशासनाची भेट काळे यांच्यासह कार्यकर्ते काँग्रेसच्या वतीने जनजागृती अभियान राबवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सखोल तपासाची मागणी :
काळे म्हणाले, कुलकर्णी यांनी एकल महिला, दारूबंदी, शिक्षण यासारख्या अनेक सामाजिक विषयावर काम केले आहे. समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात ते लढतात. राज्यभर त्यांचा नावलौकिक आहे. काही लोकांना कुलकर्णींचा कालीबुर्गी, दाभोळकर करण्याचा डाव आहे की काय याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी जाहीर मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.
यावेळी संजय झिंजे, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, आकाश आल्हाट, विलास उबाळे, सोफियान रंगरेज, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment