काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना पितृशोकज्येष्ठ नेते गुलाबराव मारुती काळे यांचे निधन

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान आज रविवारी पहाटे खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. सुमारे ३५ ते ४० वर्ष ते नगर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रियपणे काम करत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची आज पहाटे प्राणज्योत मानवली. अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे ते वडील होते. 


गुलाबराव काळे यांनी नगर तालुक्यामध्ये आपल्या राजकीय कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नगर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य, इंटक काँग्रेसचे सरचिटणीस, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष, अहमदनगर किसान जागरण मंचाचे जिल्हाध्यक्ष अशा विविध महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले होते. 


राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत नेते गोविंदराव आदिक, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यस्तरावरील अनेक नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी बेरोजगारीवर च छेडलेल्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी घेतली होती.  नगर तालुक्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठपुरावा केला. नगर तालुक्यात सारोळा कासार, घोसपुरी, बाबुर्डी बेंद परिसरामध्ये एमआयडीसी आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. अनेक गावांना पाणीपुरवठा करणारी घोसपुरी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या ती योजना चालवली होती.  


अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात युवक काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. जिल्ह्यातील यशवंतराव गडाख, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात यासारख्या अनेक दिग्गज नेत्यां समवेत त्यांनी काम केले होते. स्वर्गीय खा. दादा पाटील शेळके यांच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकी तील विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 


त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले होते. यासह ग्लोरी ऑफ इंडिया, कृषी मित्र, समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना विविध संस्थांनी सन्मानित केले होते. त्यांनी २७०० एकर पडीक जमिनीवर सुमारे २० लाख झाडांचे यशस्वीरित्या वृक्षारोपण केले होते. याच कामाची दखल घेत देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वतः काळे यांना राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाचारण करत त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली होती. 


काळे यांच्या जाण्याने नगर तालुक्यासह नगर शहरातील त्यांना मानणारे कार्यकर्ते, परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.  दरम्यान, त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक ०१.०० वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर या ठिकाणी पार पडणार आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post