नगर औरंगाबाद महामार्ग गॅस पाईपलाईन प्रकरण चिघळणार?

 


जेऊर परिसरातील परिस्थिती ; शेतकरी दांपत्याचा आत्मदहनाचा इशारा  / विहीर बुजली ; शेतीचे नुकसान ; संसारोपयोगी वस्तू गेल्या वाहून

माय नगर वेब टीम 

 नगर तालुका- नगर औरंगाबाद महामार्ग लगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन बाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. वाद घातले नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. परंतु प्रशासनाच्या गळचेप्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच नाही.



      इमामपूर येथील शेतकरी बन्सी वाघमारे यांचे नगर औरंगाबाद लगत इमामपूर शिवारात गट नंबर ११०७ मध्ये शेतीचे क्षेत्र आहे. गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना पाणी वाहून जाण्यासाठी असणारे छोटे छोटे पूल बंद करण्यात आले. तसेच उकरण्यात आलेल्या मातीचा ढिगारा टाकण्यात आला. झालेल्या पावसाने पाणी जाण्यास जागा नसल्याने सर्व माती वाहून विहिरीत गेल्यामुळे विहीर बुजली, बोअरवेल बुजला तसेच पाण्याचा लोंढा शेतातून वाहिल्याने शेतातील पिके व कांद्याचे रोप वाहून गेले. घराची भिंत पडून तेथील संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.

     गॅस पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून जेऊर परिसरातील शेतकऱ्यांचे तसेच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतापाची लाट उसळली आहे. अनेक शेतकरी, व्यावसायिक यांनी संबंधित ठेकेदाराची वाद घातला मोबदला मिळण्याची मागणी केली. परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणताही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन राहिले नाही. याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

     शेकडो झाडे, फळ झाडांची कत्तल करण्यात आली. अनेक लहान-मोठे पूल बंद करण्यात आल्याने पाणी शेतामध्ये घुसून पिकाची तसेच बांध फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यावसायिकांसमोर चर खोदल्याने गाळाचे साम्राज्य साचले आहे. संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून शेतकरी व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युत लाईन शिफ्ट करण्यात आलेल्या आहेत. त्याचे काम देखील बोगस पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

     शेतीचे, विहिरीचे, संसारोपयोगी वस्तुंच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा इमामपूर येथील शेतकरी बन्सी वाघमारे व लक्ष्मीबाई वाघमारे या दाम्पत्याने दिला असल्याने गॅस पाईपलाईनचे प्रकरण चांगलेच चिघळणार असल्याचे चित्र जेऊर परिसरामध्ये दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराची अरेरावी तसेच पोलीस बंदोबस्तात सुरू असलेले काम शेवटच्या टप्प्यात आले असले तरी जेऊर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

     संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू असताना एकेरी वाहतूक व रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून काम केले जात आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. शेतकरी, व्यावसायिक तसेच अपघातात बळी घेण्याची यांना परवानगी देण्यात आली आहे काय ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

      संबंधित ठेकेदाराला परवानगी देणाऱ्या सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेवटच्या टप्प्यात राहिलेले काम करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.


 गॅस पाईपलाईनच्या गलथान कामामुळे माझ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या. विहीर, बोअरवेल बुजला गेला. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले परंतु सर्वच खात्याचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. यामागील कारण काय हे जनतेला समजायला लागले आहे. आम्हाला मोबदला मिळाला नाही तर आत्मदहन करणार.

...... बन्सी वाघमारे (शेतकरी, इमामपूर)



 गॅस पाईपलाईनच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुल बंद करण्यात आल्याने शेतीतील पिके व माती वाहून गेली आहे. प्रशासनाचे सर्वच अधिकारी याबाबत गप्प का ? शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही राजकीय पुढारी तसेच अधिकारी उभा राहिलेला नाही. तरी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मोबदला मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा जनआक्रोश झाल्यास अनुचित प्रकार घडू शकतो.

..... निलेश गोरे ( शेतकरी जेऊर )

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post