कोल्हार घाटातील घटना ; सुमारे चार तोळे सोने लंपास ; शोध मोहीम सुरू
माय नगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील सागर कन्स्ट्रक्शन पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सतीश गीते यांना भर दिवसा कोल्हार घाटात अडवुन सुमारे चार तोळे सोने लंपास केल्याची घटना बुधवार दि.९ रोजी सकाळी अकरा वाजता घडली.
भर दिवसा झालेल्या या लुटीने परिसरात खळबळ उडाली आहे. व्यवस्थापक सतीश मारुती गीते हे पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडी या आपल्या गावावरून पंपावर कामासाठी येत होते. त्यांच्यासोबत नातेवाईक सीताबाई रामदास वायभासे (रा. सारसनगर, अहमदनगर) या होत्या. कोल्हार घाटात वळणाच्या चढावर पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी गीते यांची दुचाकी अडवुन मारहाण करत लुटमार केली.
सतीश गीते यांच्या खांद्यावर कोयत्याने मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या हातातील एक तोळ्याची अंगठी काढून घेण्यात आली तर सीताबाई वायभासे यांच्या अंगावरील सुमारे तीन तोळे सोने काढून घेण्यात आले आहे. गीते यांच्या खिशातील रोख रक्कम एक हजार पाचशे ही चोरून नेण्यात आले. चोरट्यांनी आपले तोंड रुमालाने बांधलेले होते. दोन दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी मारहाण करून लुटमार केल्याची माहिती गीते यांनी दिली.
चोरट्यांकडे एचएफ डीलक्स व पल्सर गाडी होती. कोल्हार घाटात सतीश गीते यांना लुटण्यापूर्वी अर्धा तास अगोदर मिरी तालुका पाथर्डी परिसरात देखील असाच प्रकार घडला होता. त्यातही याच चोरांचा सहभाग असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणा सतर्क करत ठीक ठिकाणी नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी आगडगाव घाटामध्ये जात असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला असता चोरांनी गाड्या सोडून डोंगरात पलायन केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ व कर्मचारी स्थानिक तरुणांच्या मदतीने आगडगाव घाटातील डोंगर रांगांमध्ये आरोपींचा शोध घेत आहेत.
Post a Comment