ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी भव्य स्टेडियम उभारणे गरजेचे - पद्मश्री पवार निंबळक क्रिकेट चषक भगवे वादळ संघाने पटकाविला 

माय अहमदनगर वेब टीम

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी भव्य स्टेडियम उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे.

     नगर तालुक्यातील निंबळक येथे आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी पवार बोलत होते. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मैदाने संपुष्टात आली आहेत. मोबाईलच्या युगात मैदानी खेळाकडे तरुण पिढीचे दुर्लक्ष झाले आहे. मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहत असून मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजेत. त्यासाठी भव्य स्टेडियम उभारणे गरजेचे असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.     नगर तालुक्यातील निंबळक येथे आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचा मानकरी भगवे वादळ संघ ठरला आहे. स्पर्धेतील अंतिम सामना भगवे वादळ क्रिकेट संघ विरुद्ध संभाजीनगर औरंगाबाद क्रिकेट संघामध्ये पार पडला. त्यामध्ये भगवे वादळ संघाने औरंगाबाद संघाचा पराभव करून प्रथम पारितोषिक व चषक पटकाविला. द्वितीय पारितोषिक संभाजीनगर औरंगाबाद संघ, तृतीय वॉरियर संघ निंबळक तर चतुर्थ पारितोषिक इलेव्हन नगर या संघाने मिळविले. अतुल मगर याचा आदर्श व सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.

     स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चापळगावकर, युवा उद्योजक अजय लामखडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. निंबळक येथील ग्रीन हिल स्टेडियमवर सदर स्पर्धा पार पडल्या. अजय लामखडे यांनी निंबळक गावात सन १९८० पासून म्हणजे गेली ४२ वर्ष अविरतपणे क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडू हे उत्तम खेळ खेळतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच औद्योगीकरणाच्या नावाखाली खेळाची मैदाने संपुष्टात येत असल्याची खंत देखील लामखडे यांनी व्यक्त केली. या स्पर्धांमधूनच खेळाडूंचे कौशल्य दिसून येते व ते पुढे खेळामध्ये करिअर घडू शकतात. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे अजय लामखडे यांनी आभार मानले.

      स्व. संजय लामखडे व स्व. विलासराव लामखडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोस्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ निंबळक यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण प्रसंगी व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर, माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, तोफिक पटेल, अशोक कळसे, संभाजी सोनवणे, नाना दिवटे, बाळासाहेब कोतकर, सुनील जाजगे, बाबासाहेब पगारे उपस्थित होते.


 अजय लामखडे यांच्या कार्याचे कौतुक 

युवा नेते अजय लामखडे हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतात. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ४२ वर्षापासून अविरतपणे भरविण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेबद्दल पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके व उपस्थितांनी अजय लामखडे यांचे कौतुक केले. लामखडे कुटुंबाच्या वतीने निंबळक येथे सलग ४२ वर्षापासून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. हा एक विक्रमच आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आमच्या कुटुंबांनी या स्पर्धेला सुरुवात केली. ती परंपरा अविरतपणे सुरू राहणार आहे. तसेच आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून लवकरच निंबळक येथे भव्य स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

 सौ. प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post