कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद, संदेश कार्ले म्हणाले...
माय अहमदनगर वेब टीम -

गेल्या लिलावापेक्षा आज तब्बल दोन हजार रुपयांनी कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लिलाव बंद पडले. 

आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समिती आवारात लिलाव सुरू होताच अवघ्या 1800 रुपये क्विंटलने सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी जिल्ह्यतील पारनेर आणि इतर बाजार समित्यांच्या बाजार भावाची आणि लासलगाव बाजार भावाची माहिती घेतली तर तेथे 3500 ते 3800 पर्यंत लिलाव सुरू होते.त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.त्यांनी सुरू असणारे लिलाव बंद पाडले. काही शेतकऱ्यांनी शिवसेना नेते आणि जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना फोन करून बोलावून घेतले. कार्ले शेतकऱ्यांच्या मागणी खातर कौटुंबिक तेरावा विधी सोडून घटनास्थळी दाखल झाले. संदेश कार्ले यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी, व्यापारी,मार्केट कमिटीचे सचिव अभय भिसे ,  जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक निखिल वारे सर्व शेतकरी यांच्या समोरच चर्चा केली. कांदा वाहतूक करणारे टेम्पोवाले यांना काही अडते कमिशन देतात,  काही अडते स्वतःच कांदा कमी भावात घेऊन नंतर व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी आणि अडते यांच्यात आर्थिक देवाण घेवाण असून त्यातून शेतकऱ्यांची लूट होते अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. नगरसेवक निखिल वारे यांनीही यावेळी शेतकऱ्यांची बाजू खरी असल्याचे मत व्यक्त केले. त्या नंतर कमी भावात गेलेला कांदा शेतकरी यांना मान्य नसल्याने त्याची जबाबदारी मार्केट कमिटीने घ्यावी,अडत्याने स्वतः माल कमी भावाने घेऊ नये,तसेच अडत्याने कांदा वाहतूक करणाऱ्या टेम्पो वाल्याना कमिशन देत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

 नगर तालुका पोलीस ठाण्याचे सानप, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या वेळी नगर तालुका शिवसेनेचे उपतालुका  प्रमुख प्रकाश कुलट,संदीप जगताप, सचिन सातपुते  जिल्यातील सुमारे दोन ते अडीच हजार शेतकरी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post