संजय राऊतांचा सवाल ; शरद पवारांसारखा तगडा उमेदवार विरोधी पक्षांकडे आहे का?मुंबई :   राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा तगडा उमेदवार विरोधी पक्षांकडे आहे का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी 6 महिन्यांपूर्वीच तयारीला सुरुवात करायला हवी होती. मात्र, आता उशीर झाला असल्याची खंतदेखील राऊत यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उभे रहावे, असा आग्रह सर्व विरोधी पक्षांनी केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही पवारांना सर्व नेत्यांनी निवडणुकीस उभे राहण्याचा आग्रह केला होता. मात्र, पवार त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी जो उमेदवार उभा केला जाईल, त्याला आम्ही मान्यता देऊ, असे संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवारांनी निवडणुकीसाठी होकार दिला असता तर निवडणूक रंगतदार झाली असती. राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत आणि खासदारांच्या मतांचे मुल्य सर्वाधिक असते. त्यामुळे भाजप मजबूत स्थितीत असला तरी ही निवडणूक केवळ खासदारांच्या मतांवर जिंकता येत नाही. महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्ये हे भाजपविरोधी आहेत. त्यामुळे शरद पवार निवडणुकीस उभे राहिले असते तर भाजपविरोधी सर्वांनी आपली मते शरद पवारांच्याच पारड्यात टाकली असती, असे संजय राऊत म्हणाले. मात्र, यासाठी आम्ही 6 महिने आधीच तयारी सुरु करायला हवी होती, असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रपती पद हे देशासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे असते. त्यामुळे या पदाबाबत सर्वपक्षीय संमती व्हावी, अशी अपेक्षा असते. एपीजे अब्दूल कलाम, प्रणव मुखर्जी यांसारख्या सर्वमान्य नेत्यांनी हे पद यापूर्वी भूषवले आहे. मात्र, आता अशा व्यक्तींचा फार शोध घ्यावा लागतो. शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे इतर नावे चर्चेत येत आहेत. मात्र, त्यांच्या नावावर सर्वसहमती होणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले.

राष्ट्रपती आता पक्षीय कार्यकर्ता

राष्ट्रपती पदासाठी सर्वपक्षीयांकडून एखाद्या नावावर सहमती न झाल्यास सत्ताधारी पक्षाकडून आपल्या विचारधारेच्या नेत्याला या पदावर बसवले जाते. ती व्यक्ती त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम पाहते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला रोख आहे का?, असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर अधिक बोलण्यास मात्र राऊतांनी नकार दिला.

पक्षांनी आपापले आमदार सांभाळावेत

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सहा दिवसानंतरच आमदारांना पुन्हा हॉटेलमध्ये बोलवण्यात आले आहे. त्यातच शिवसेना समर्थित काही आमदारांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही संवाद साधल्याचे वृत्त आहे. त्यावर प्रत्येक पक्षाने आपापले आमदार सांभाळावे, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post