बिबट्याकडुन शेळीची शिकार कालवडीवर हल्ला जेऊर येथील घटना ; नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील तोडमल वस्ती येथे बिबट्या कडून शेळीची शिकार करण्यात आली असून कालवडी वर हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना सोमवार दि. २० रोजीच्या रात्री घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून बिबट्याचे वास्तव्य आढळून येत आहे. बिबट्याकडुन परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. घोडा, गाय, शेळी, मेंढी तसेच अनेक कुत्र्यांच्या शिकार बिबट्याकडुन करण्यात आलेल्या आहेत. परिसरात वनविभागाच्या वतीने पिंजरा देखील लावण्यात आला होता.

       तोडमल वस्ती येथील सुरज अशोक तोडमल या शेतक-याच्या शेळीची शिकार करण्यात आली तर कालवडीवर हल्ला करून जखमी करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात बबन साळवे यांच्या शेळीची शिकार करण्यात आली होती. तर पंधरा दिवसांपूर्वी सुरज तोडमल यांच्या गायीवरती देखील बिबट्याने हल्ला केला होता त्यामध्ये गायीचे शिंग तुटले होते पण गाय वाचली होती. आज शेळीची शिकार व काववडीवर हल्ला केल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

       जेऊर परिसरात गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राण्यांसाठी हा परिसर नंदनवन ठरत आहे. येथे नेहमीच बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून तर बिबट्याकडुन मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी एका बिबट्याचा नगर औरंगाबाद महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता.

          वनविभागाच्या वतीने वनरक्षक श्रीराम जगताप, वनरक्षक मनेष जाधव, वनकर्मचारी संजय सरोदे, तुकाराम तवले, संजय पालवे यांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्याने बिबट्याच्या भितीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी घाबरत आहेत. अनेक पाळीव प्राण्यांची शिकार करणा-या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जेऊर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

____________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post