नगर औरंगाबाद महामार्गावर क्रुझर गाडीला भिषण अपघात १ ठार ८ गंभीर जखमी ; १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायीनी

 माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका-- नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात शुक्रवार दि. २७ रोजी पहाटे क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम. एच. १४ एच.यु. ०२२७) क्रुझर गाडीने (क्र. एम. एच.१६ ए.टी.१४०६) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. क्रुझर गाडी नगर कडून औरंगाबाद कडे चालली होती. अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला.

     अपघातात शांताराम लक्ष‍मण घन (वय ४० रा. घनवाडा ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद ) हा जागीच ठार झाला तर श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२),वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत. जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

     अपघाताची माहिती समजताच तात्काळ १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सोनई, जेऊर, जिल्हा रुग्णालय व मिरी येथील चार रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, भाऊसाहेब बंगे, डॉ. सचिन कोरडे  यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केली. १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे जखमीं साठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

__________________________________________

कांचन बिडवे यांची सतर्कता 

पांढरीपुल परिसरात भीषण अपघात झाल्याची तसेच अपघातात जखमींची संख्या जास्त असल्याची माहिती १०८ रुग्णवाहिका प्रमुख कांचन बिडवे यांना समजताच त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लावून जेऊर, जिल्हा रुग्णालय, मिरी तसेच सोनई येथिल चार १०८ रुग्णवाहिका अपघात स्थळी पाठवल्या. कांचन बिडवे यांच्या सतर्कतेबद्दल नागरिकांमधून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

__________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post