....अखेर पिंपळगाव तलावातील बेसुमार वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल १२६ विविध जातींच्या वृक्षांची तोड ; शिवप्रहार संघटनेचे यश

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान करण्यात आले होते. त्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावाचे सुमारे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे. येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष असून गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वृक्षांची तोड करण्यात येत होती. त्याबाबत शिवप्रहार संघटनेचे गोरख आढाव यांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता.

     त्यानुसार महानगरपालिका अधिकारी यांनी सदर वृक्षतोडीचा पंचनामा केला तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील झालेली वृक्षतोड यांची पाहणी केली. पालिकेचे अधिकारी तलावात पंचनामा करण्यासाठी गेले असता वृक्षतोड करणाऱ्यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला होता. त्यावरून हे प्रकरण चांगलेच गाजले होते. झालेल्या वृक्षतोडीबाबत पालिका काय भूमिका घेणार या बाबीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

      पिंपळगाव माळवी येथील १२६ झाडे बेकायदेशीरपणे तोडून चोरून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे व इतर व्यक्ती (सर्व रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

    तलावातील एकूण १२६ झाडांची चोरी केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंबाची २४ झाडे, गोडी बाभळ ९५ झाडे, शिरीष ६, आंबा १ अशी एकूण १२६ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या विरोधात भा.दं..वि. कलम ३७९ अन्वये झाडांची चोरी करणे तसेच झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_________________________

 १२६ झाडांची किंमत फक्त ८० हजार

 फिर्यादी मध्ये १२६ झाडे चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. १२६ झाडांची अंदाजे किंमत ८० हजार दाखविण्यात आली आहे. १२६ झाडांची किंमत फक्त ८० हजार कशी होऊ शकते. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

______________________________

 दुसरा गुन्हा दाखल होणार ?

 पिंपळगाव तलावातील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर विविध साहित्याची चोरी झाल्याची बाब गोरख आढाव यांनी महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेचा देखील पंचनामा केला असून अहवाल तयार केला आहे. पंपिंग स्टेशन साहित्य चोरीप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

__________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post