माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाइपलाईनच्या मनमानी कारभाराविरोधात संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जेऊर व इमामपूर ग्रामपंचायतच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गालगत जास्त पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. काम करताना कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून काम करत मोठे नुकसान करण्यात आलेले आहे. तसेच शेतकऱ्यांची मोठ-मोठाले फळ झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे.
व्यावसायिकांचे तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. दुकाने, हॉटेल व इतर व्यावसायिकांसमोर चर खोदून दोन-तीन महिने आहे त्या परिस्थितीत ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. गॅस पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील घडलेले आहेत. इमामपुर येथील धार्मिक स्थळ बोराई मातेच्या चौथ-याचे नुकसान करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आलेले आहे. तसेच इमामपुर येथील महेश राधाकिसन आवारे यांच्या ऊसाच्या रसवंती चे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे.
संबंधित ठेकेदार शेतकरी व व्यावसायिक यांच्याशी अरेरावी करत आहे. तरी संबंधित ठेकेदारा विरुद्ध झालेल्या नुकसानीबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या बाबतीतही मृत्यूस कारणीभूत झाल्या बाबत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावेत. तसेच परिसरातील शेतकरी, व्यवसायिक यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा ग्रामस्थ परिसरात काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा जेऊर ग्रामपंचायत व इमामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच भीमराज मोकाटे जेऊर उपसरपंच श्रीतेश पवार यांनी दिला आहे.
________________________________
गॅसपाईपलाईन साठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विद्युत लाईन अनेक ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे. गॅस पाईपलाईन च्या कामासाठी तात्काळ परवानगी देणारे अधिकारी शेतकऱ्यांबाबत उदासीन का असतात. संबंधित ठेकेदाराच्या मनमानी विरोधात पंचक्रोशीत आक्रोश निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यातून अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी.
...... श्रीतेश पवार (उपसरपंच, जेऊर)
_______________________________________
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
नगर औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेले गॅसपाईपलाइनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात आवाज उठवून देखील ठेकेदारावर काही कारवाई अथवा समज देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढतच आहे. शेतकरी, व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास हे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे.
_______________________________________
Post a Comment