निंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध : दोन दिवस चालणार यात्रोत्सव

 माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रोत्सवाची जय्यत तयारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. येथील कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध आहे.

     सालाबाद प्रमाणे वैशाख बुद्ध पौर्णिमेला खंडोबा यात्रा उत्सव भरत असतो. सोमवार दि. १६ मे व मंगळवार दि. १७ मे दोन दिवस यात्रा उत्सव भरणार आहे. यादरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

       सोमवार रोजी सकाळी कावडीने पायी आणलेल्या गंगेच्या पाण्याने देवाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य कावड मिरवणूक, सायंकाळी छबिना मिरवणूक, शोभेची दारु, लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार रोजी भव्य निकाली कुस्त्यांचा हगामा लामखडे कुटुंबीयांच्या वतीने भरविण्यात येत असतो. येथील कुस्त्यांसाठी राज्य, परराज्यातील मल्ल येत असतात. निंबळक गावचा कुस्त्यांचा हगामा राज्यात प्रसिद्ध आहे.

      निंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे यात्रोत्सवा दरम्यान संपूर्ण राज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. यात्रा उत्सवानिमित्त देवस्थान परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

      यात्रा उत्सवादरम्यान येणाऱ्या सर्व भाविकांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी यात्रा उत्सव समिती तसेच ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. येथील यात्रा उत्सव तसेच कुस्त्यांच्या हगाम्यासाठी जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे तसेच सरपंच सौ. प्रियंका लामखडे, यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

______________________________________

 मोक्षरथाचा लोकार्पण सोहळा

 निंबळक गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सवाच्या औचित्यावर स्वर्गीय माजी सरपंच विलास लामखडे यांचे स्मरणार्थ निंबळक ग्रामस्थांसाठी मोक्षरथाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रियंका अजय लामखडे यांनी दिली.

_____________________________________

 खंडोबा मंदिराचे सुशोभीकरण पूर्ण

 आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून खंडोबा मंदिर परिसराचे सुशोभिकरण पूर्ण करण्यात आले आहे. निंबळक मुख्य रस्ता स्ट्रीट लाईट, देवस्थान येथे भक्तनिवास, पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रीटलाइट असे विविध कामे आमदार लंके यांच्या निधीतून पूर्ण झाल्याची माहिती युवा नेते अजय लामखडे यांनी दिली.

__________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post