जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा!; त्यांना शरद पवारांना…

 



माय अहमदनगर वेब टीम 

शुक्रवारी मोठ्या संख्येनं आंदोलक एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करतानाच काहींनी पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण केलं जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.


शरद पवारांच्या निवासस्थानी जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी शरद पवारांना जबाबदार धरत त्यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. यावरून पोलिसांनी कारवाई करत १०९ आंदोलक कर्मचारी आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.


“महाराष्ट्राचं नशीब, असं काही घडलं नाही”

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. “परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संशय व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलकांच्या मागे कोणतीतरी शक्ती होती, हे लोक असे नाहीत असं सांगतानाच अजित पवार यांनी हा प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचं नमूद केलं आहे.


दरम्यान, कालच्या घटनेबाबत खूप काही माझ्या कानावर आलंय, असा दावा अजित पवार यांनी शनिवारी बोलताना केला आहे. “कालच्या घटनेबाबत खूप काही कानावर आलं आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post