कुस्त्यांचा थरार पाहून शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले

 


राज्यभरातील नामवंत मल्लांची हजेरी

माय अहमदनगर वेब टीम- 

नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त गुरुवारी (दि.७) आयोजित करण्यात आलेल्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्ती मल्ल विद्येतील आपले कसब दाखविले.यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याचे दिसून आले.



सारोळा कासारचा वार्षिक यात्रोत्सव आणि कुस्त्यांचा आखाडा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.दरवर्षी चैत्र पंचमीला हा यात्रोत्सव साजरा केला जातो.त्यानंतर दुसऱ्या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो.त्यासाठी गावकरी लोकवर्गणी जमा करतात.कोरोना मुळे २ वर्षे यात्रा व कुस्त्यांचा आखाडा झाला नव्हता, त्यामुळे या वर्षी गावकऱ्यांचा उत्साह अधिक होता.लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून गुरुवारी इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला, रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला. गावच्या लोकवर्गणी सह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढविला.कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील तसेच हरियाणा येथील अनेक मल्ल या ठिकाणी आले होते. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर, अकोळनेरचे सरपंच प्रतिक शेळके यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी तसेच कुस्ती प्रेमी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक कुस्त्या अतिशय रंगतदार झाल्या, मल्लांचे डाव – प्रतिडाव,चपळाई,कुस्ती मल्लविद्येतील कसब पाहून टाळ्या व शिट्ट्यांचा आवाज घुमत होता.५०० रुपयांपासून १५ ते २० हजार रुपयांपर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या या आखाड्यात लावण्यात आल्या.राष्ट्रीय खेळाडू असलेल्या महिला कुस्तीपटू अक्षदा भंडारे(एरंडोली,ता.श्रीगोंदा) व पल्लवी पोटफोडे (वडगाव दरेकर ता.दौंड) यांच्यात झालेली कुस्ती प्रेक्षणीय ठरली. 

आखाड्याचे समालोचन व सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस व शिक्षक नेते संजय धामणे यांनी केले.पंच म्हणून राजाराम धामणे, परसराम काळे, दत्तात्रय कडूस, उत्तम कडूस, बब्बू इनामदार यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी फकीरातात्या कडूस, बाबासाहेब धामणे, मच्छिंद्र काळे, सुभाष धामणे, बबन तांबोळी, सुरेश धामणे, डॉ.श्रीकांत देशपांडे,जयसिंग कडूस, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post