विखे पाटलांना रोखण्यासाठी मुरकुटे-ससाणेंचे मनोमिलन !

 


टाकळीभान |अनेक वर्षे काँग्रेस (Congress Party) पक्षात असतानाही शह कटशहाचे राजकारण (Political) करणारे जिल्ह्यातील मातब्बर नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) व माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) आता दोन वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांच्या विरोधात राजकीय कुरघुड्या करताना दिसत आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या वचर्स्वाला छेद देण्यासाठी ना.थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पावर गेम करून तालुक्यातील पारंपरीक विरोधक माजी आ. भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) व श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे (Shrirampur Deputy Mayor Karan Sasane) यांच्या मनोमिलनासाठी पुढाकार घेतला आहे.

नगर जिल्ह्याच्या राजकारणात ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) व माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात असूनही एकमेकांना शह देत होते. अनेकदा राज्याच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटत होते. लोकसभा निवडणुकीत आ. विखे पाटील यांनी कमळ हाती घेतल्याने जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची धुरा आपोआपच एकहाती आली आणि शह कटशहाच्या राजकारणाचा वेग वाढला.

श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत विखे पाटलांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. तालुक्यातील मोठा गोतावळ्याची भूमिका नेहमीच त्यांच्या इशार्‍यांवर ठरलेली आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटेही बराच काळ विखे समर्थक राहिलेले आहेत. विखे पाटलांनी विधानसभेत माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांना मदत केल्याने मुरकुटे पराभूत झाल्याने विखे- मुरकुटे संबंध ताणले गेले होते. तेव्हापासून तालुक्यात ससाणे-मुरकुटे हा टोकाचा संघर्ष तालुक्याने व जिल्ह्याने पाहिलेला आहे. दोन्ही नेते आता दोन वेगवेगळ्या पक्षांत असल्याने जिल्ह्यात आपलीच ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. आ.विखे पाटील यापूर्वी कायम राज्याच्या सत्तेत असल्याने जिल्ह्यात त्यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र पक्षांतरामुळे आता ते सत्तेच्या बाहेर राहिले आहेत तर ना. थोरात महाविकास आघाडीत वजनदार नेते आहेत.

जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात नेहमीच विखे पाटलांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. कधी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना तर कधी माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांना त्यांनी ताकद दिलेली आहे. ससाणेंना पहिल्यांदा आमदार करण्यासाठी मुरकुटेंच्या विरोधात त्यांनी शक्ती लावल्याने मुरकुटेंचा अनपेक्षित पराभव झाला होता. आणि तेव्हापासून मुरकुटे-ससाणे हा संघर्ष टोकाचा झाला होता. ससाणे हयात असेपर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांना खिंडीत पकडण्याची संधी सोडत नव्हते. मात्र प्रवरेच्या आशिर्वादाने ससाणे नेहमीच जयंत होत होते. विखे पाटलांच्या पक्षांतरानंतर ना. थोरातांनी श्रीरामपूरकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

आ. लहु कानडे यांना विधानसभेत तिकीट देऊन नियोजनबध्द पध्दतीने त्यांना विजयी करुन विखे पाटलांची पहिली कोंडी केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षात आ. कानडे यांना विकासनिधी मोठ्या प्रमाणात मिळवून देऊन विकास कामे सुरू केली आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांची निवडणुकीत होणारी कुस्ती टाळून दोघांनाही जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करून श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा दिली. गेल्या काही दिवसांत ना. थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यात मोठा संपर्क वाढवलेला आहे. आ. डॉ. सुधीर तांबे हे तर नियमित श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.

आ.कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यात सहमती घडवून आणण्याचे काम ना. थोरात यांनी केल्याने आगामी काळात या तिघांची शक्ती एकत्र करून निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरपालिका, बाजार समिती, अशोक कारखाना व त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होत आहेत. आगामी काळात विखे पाटलांचे श्रीरामपूर तालुक्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी ना. थोरातांनी पावर गेम केली आहे. त्यात कितपत यश येणार हे होणार्‍या निवडणुकांच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post