शिकारीच्या जाळ्यात अडकेलल्या बिबट्याचा मृत्यू श्रीगोंदा | श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीच्या डोमाळवाडी परिसरात रानडुकराचा शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा 9-10 तासांच्या झालेल्या रेसक्यू ऑपरेशन नंतर मृत्यु झाल्याची घटना घडली. यामध्ये वनविभागाच्या अनस्थेमुळे बिबट्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

वांगदरी शिवारातील डोमाळवाडी परिसरात उसाच्या शेतात रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आले होते. रविवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास या जाळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे परिसरातील शेतकर्‍याला समजताच त्यांनी वनविभागाचे अधिकारी रवींद्र भोगे यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बिबट्याच्या रेस्क्यूसाठी माणिकडोह येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रेसक्यु टीम घटनास्थळी पोहोचून त्यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला बेलवंडी येथील नर्सरी मध्ये नेण्यात आले.

त्या दरम्यान बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने प्राणी मित्रांमधून एकच संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही राजापूर येथे अशीच घटना घडली होती. त्यावेळी संगमनेर येथील रेस्कयु टीमची मदत घेण्यात आली होती. तर काल वांगदारी येथे पकडलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने याची जबाबदारी अधिकारी घेणार का? असा सवाल प्राणी मित्र विचारात आहेत.अहमदनगर वनविभागाने अशा प्रकरणातून बोध घेऊन नगर जिल्ह्यात रेस्क्यूं टीम तयार करणार की भविष्यात अशा घटना घडतच राहणार आणि वनविभाग याकडे डोळेझाक करत राहणार हा प्रश्न निर्माण होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post