‘8 पदरी रस्ता, 6 पदरी पुल अन् वर मेट्रो’; नितीन गडकरींचं पुण्यासाठी मोठं स्वप्न!


पुणे | केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. नितीन गडकरींनी मंगळवारी सकाळ माध्यम समुहाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील विविध विकासकामांच्या विषयावर आपलं स्पष्ट मत मांडलं. त्याचबरोबर त्यांनी एक इच्छा देखील बोलून दाखवली आहे.

पुणे नगर मार्गावरील वाहतूक कोंडीचा उपाय काढण्यासाठी वाघोली ते शिरूर दरम्यान 50 किलोमीटरचा तीन मजली उड्डाण पुल बनवायचा आहे. खालच्या तळात आठ पदरी रस्ता, पहिल्या मजल्यावर सहा पदरी पुल आणि त्याच्यावर मेट्रो धावेल, अशी या उड्डाण पुलाची रचना असणार आहे. हा सर्व मार्ग जागतिक दर्जाचा असणार असल्याचं देखील गडकरींनी सांगितलं आहे.

पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे अडथळे दूर झाले आहेत. सुरतपासून दक्षिणेकडील राज्यात जाण्यासाठी नविन रस्ता तयार करत आहे. त्यामुळे पुण्यातून दक्षिणेत जाणारी जड वाहतूक कमी करून नविन मार्गावर वळवण्यात येईल, असं गडकरींनी सांगितलं आहे. पुणे शहराच्या वाढीसाठी आता मर्यादा आल्या आहेत. आता नविन पुणे वसवण्याची गरज असल्याचं देखील गडकरींनी यावेळी बोलून दाखवलं.

दरम्यान, पुणे शहरामधून पंढरपूर, कोल्हापूरपर्यंत 250 किलोमीटर ब्राॅडगेज मेट्रोचे जाळं निर्माण करता येऊ शकतं. तसेच आळंदीपर्यंत मेट्रो धावू शकते, फक्त लोकप्रतिनिधींची काम करण्याची इच्छा हवी, असंही गडकरी म्हणाले. तसेच यासाठी प्रति किलोमीटर 2.5 कोटी रूपये इतका ब्राॅडगेजसाठी खर्च येवू शकतो. ही ब्राॅडगेज मेट्रो पूर्ण झाल्यावर पुणे ते कोल्हापूर अंतर अडीच तासांवर येईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post