आम्ही फक्त एका व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व देतो; राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला


माय वेब टीम 

 नागपूर | प्रत्येक कार्यक्रमात स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्षांना डिवचणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी आज पटोले यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही,' अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला हाणला आहे.


नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले यांच्या काही विधानांवरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. पटोले यांनी स्वबळाचा नारा देताना केलेल्या काही विधानांमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. आता पटेल यांनीही पटोले यांना टोला हाणला आहे. 'ज्याला जे करायचं आहे ते करू द्या. आमची आघाडी आहे. पण कुठल्याही पक्षाला आम्ही बांधून ठेवलेलं नाही. ते काय करतात, त्यावर आम्ही उत्तरं का द्यायची,' असा सवाल पटेल यांनी केला.

'महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. सरकारला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढंही राहणार आहे. एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात. त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण पवार साहेबांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले. त्याचा अर्थ काय तो समजून घ्या. नाना पटोले रोज बोलतात, त्यावर बोलणं मला शोभत नाही. त्यांच्याविषयी जे काही बोलायचं होतं, त्यावर पवार साहेब बोलले आहेत. त्यामुळं त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही,' असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post