“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”


माय वेब टीम 

अकलूज | कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या यात्रेवर सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. सरकारच्या या निर्बंधामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने पायी वारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देखील कडक निर्बंध लावल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

वारकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा भूमिका मांडली. परंतु हे सरकार कान असून बहिऱ्यासारखं करत आहे. किंबहुना या सरकारच्या संवेदनाच गोठल्या आहेत. हे संवेदनशील सरकार असते तर आमची मंदिरे, देवदेवता टाळ्यात आणि कुलुपांत राहिली नसती, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म सर्वकाही बासणात गुंडाळले आहे. जे मंदिरांना टाळे लावू शकतात, त्यांना वारकऱ्यांची किती काळजी असणार?, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे. आम्ही सर्व नियम पाळू असं वारकरी सांगत होते, मात्र सरकारचे धोरण मात्र आम्हाला हवं तसंच आम्ही वागू असं आहे, असं देखील दरेकर म्हणाले.

दरम्यान, नानांच्या नाना तऱ्हा असतात. नाना सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्राॅ होतात. यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे, अशी टीका देखील प्रविण दरेकर यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post