ईडीचे अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स ; वैयक्तिक सचिव आणि सहाय्यकाला अटक

 


माय वेब टीम 

मुंबई - 100 कोटी वसूलीच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी अनिल देशमुख यांना मुंबईमधील आपल्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील 6 ठिकाणी छापेमारी केली होती.

दरम्यान, ईडीने रात्री उशिरा त्यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली होती. त्या दोघांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) अटक करण्यात असून त्यांना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे.

ईडीने शनिवारी देशमुख यांचे निकटवर्तीय सागर नावाच्या व्यक्तीच्या नागपूरमधील एका ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. सागर हा अनिल देखमुख यांच्या तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्येही संचालक होता. सागर नावाच्या या व्यक्तीचा कोलकातामध्ये कोट्यवधींचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे.

देशमुख म्हणाले - आयुक्त असताना परमबीर यांनी आरोप का केले नाही?
ईडीच्या या छापेमारीनंतर अनिल देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, परमबीर सिंह हे आयुक्त असताना आरोप का केले नाही? त्यांना पदावरुन दूर केल्यानंतर माझ्याविरोधात खोटे आरोप केले आहे. एनआयएने अटक केलेले सर्व पोलिस अधिकारी थेट परमबीरला रिपोर्ट करायचे. पदावरुन हटवण्याचे कारण म्हणजे परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. अनिल देशमुख पुढे म्हणाले की, 'मी ईडीच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य करीत असून भविष्यातही मी असे करत राहील. सत्य काय आहे हे लवकरच सर्वांसमोर येईल.

9 तास केली चौकशी
ईडीच्या या पथकात फॉरेन्सिक टीमचा ही समावेश होता. अनिल देशमुख यांचे सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी येथेही झाडाझडती सुरू होती. 9 तास ईडी अधिकाऱ्यांनी दोन्ही निवासस्थांची झडती घेतली. नागपूरमध्ये यापूर्वी ईडीच्या पथकांनी 16 जून रोजी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्यावर धाडी टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती.

मोबाइल, कागदपत्रे जप्त
ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाइल आणि डिजिटल डाटा ताब्यात घेतला. या वेळी देशमुख ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी सुखदा इमारतीमधील घरी होते. या सर्वांची चौकशी झाली. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.

4 कोटी हप्त्याचा तपास
ईडीने या प्रकरणात मुंबईतील काही बारमालकांचे जबाब यापूर्वी नोंदवले होते. त्यात 10 बारमालकांनी देशमुख यांना काही महिने मासिक 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली होती. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई व नागपुरात छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रकरण काय ?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहिन्याला 100 कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप त्यात होता. परिणामी देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेल कंपन्या किंवा हवालामार्फत पैसा गुंतवला आहे का, याचा तपास ईडी करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post