“काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?”


 

माय वेब टीम 

मुंबई - अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. यावेळी शिवसेनेने कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

“अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. बाबरीचे घुमट शिवसैनिकांनी तोडताच मुंबईसह देशातील अनेक भागांत दंगली उसळल्या. त्यातही असंख्य हिंदूंना प्राण गमवावे लागले. गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसवर हल्ला झाला. ते पुढे ‘गोध्राकांड’ म्हणून इतिहासात नोंदले गेले. त्या गोध्राकांडानंतरही अयोध्येहून परतणाऱ्या असंख्य रामसेवकांचे मृत्यू झाले. मुंबईत 93 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून धर्मांध पाकडय़ांनी शेकडो निरपराधांचे प्राण घेतले. हा अयोध्या लढय़ाचाच बदला होता. अशा असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार नाही!

“अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साधारण साठ एकर परिसरात उभे राहात आहे. त्यासाठी जमीन संपादन करावी लागत आहे. अयोध्येतील अनेक आश्रम, मठ, धार्मिक संस्थांच्या जमिनी त्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत व त्या जमिनीचा मोबदला मूळ मालकांना दिला जात आहे. ज्या जमिनीचा संशयास्पद व्यवहार समोर आणला आहे. तो प्रकार समजून घेतला पाहिजे. बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. हा व्यवहार फक्त दोन-पाच मिनिटांत झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन दोन कोटींना विकली. पुढच्या काही मिनिटांत हीच जमीन राममंदिर ट्रस्टला 18.5 कोटींना विकली. काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post