राम मंदिर : फडणवीसांनी गायले भजन, मुंडेंनी रेखाटले चित्र


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे सध्या देशभर आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर, महाराष्ट्रातल्या नेत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला होता. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायले आहे. 

राम मंदिराचं भूमिपूजन होताच, देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी भजन गायलं आहे. तसंच, राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान आम्ही हेच भजन गात असू. आज पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, असाही उल्लेख त्यांनी केला आहे.

अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी घरातच प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा केली. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रभू रामाला अनोखं अभिवादन केलं आहे. 

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुंचल्यातून प्रभू रामाचं अप्रतिम चित्रं रेखाटल आहे. तर, नितीन गडकरी यांनीही सहकटुंब श्री रामाच्या प्रतिमेची पूजा केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूरमधील घरात गुढी उभारत हा सोहळा साजरा केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post