'प्रशांत... तू आता भावी आमदार आहेस'माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी संपली होती. सारे काही निवांत झाले होते. अधिकारीवर्ग मतांचा हिशेब जुळवणीत व्यस्त होता. त्याचवेळी अचानक बिगरशेती मतदारसंघातील विजयी उमेदवार प्रशांत गायकवाड मतमोजणी स्थळी आले. त्यावेळी या मतदारसंघातील पराभूत उमेदवार दत्ता पानसरे तेथे समर्थकांसह बसले होते. त्यांना पाहून गायकवाड तिकडे गेले व त्यांनी दत्ता पानसरे यांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतला. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत दत्ता पानसरे यांनीही त्यांना आशीर्वाद दिला व तू आता भावी आमदार आहेस, अशी भविष्यवाणीही वर्तवली. अचानक घडलेल्या या घटनेची मोठी चर्चा मतमोजणी स्थळी उपस्थित कार्यकर्ते व मतमोजणी कर्मचाऱ्यांमध्ये रंगली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिगरशेती मतदारसंघाची निवडणूक खूपच चुरशीने लढली गेली. सुमारे साडे तेराशे मतदार या मतदारसंघात होते. त्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढ होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीतच गायकवाड यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या परिसरात फटाके उडवत व गुलाल उधळत जल्लोष सुरू केला होता. निवडणूक अंतिम मतमोजणीनंतर गायकवाड 189 मतांची आघाडी घेऊन विजय झाल्याचे स्पष्ट झाल्यावर स्वतः गायकवाड मतमोजणी स्थळी आले. त्यावेळी खाली आवारातील त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. तो संपल्यावर ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मतमोजणी स्थळी आले. या मतदारसंघातील पराभूत उमेदवार पानसरे हे तेथेच समर्थकासमवेत बसले होते.


प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांना पाहून लगेच त्यांची भेट घेतली. आधी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी पानसरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पानसरे यांच्याशी बोलताना गायकवाड म्हणाले, निवडणूक काळात माझ्या काही चुका झाल्या असतील, मी काही बोललो असेल तर लहान भाऊ समजून मला माफ करा. त्यांचे हे वाक्य ऐकताच पानसरे यांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकली. ते म्हणाले, प्रशांत, तुझे अभिनंदन व तू आता भावी आमदार आहेस. या घटनेची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. पानसरे यांचे आभार मानल्यानंतर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच उपस्थित असलेले निवडणूक निरीक्षक पी. एल. सोरमारे यांचेही त्यांनी पाया पडून दर्शन घेतले. त्यानंतर मग आहेर यांच्याकडून स्वतःला पडलेल्या मतांची माहिती घेऊन ते मतमोजणी स्थळावरून बाहेर पडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post