मानसिक थकवा जाणवतोय? मात करण्यासाठी लक्षात ठेवा या ४ गोष्टी



माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - गेल्या काही महिन्यांपासून करोना विषाणूचा वाढत्या संसर्गामुळे अनेक जण तणावाचा सामना करत होते. करोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात आपण सगळेच स्वतःसोबतच प्रियजनांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो. पण, अगदी आज देखील अनेक नियम शिथिल केल्यानंतर समाजात वावरताना या विषाणूमुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. 

समाजात वावरताना देखील प्रत्येक कृती तोलून मापून करावी लागत आहे. त्या सगळ्या बंधनांमुळे थकवा जाणवणं (Health Care) स्वाभाविक आहे. खरं सांगायचं झालं तर हा काळच असा होता की, नैराश्याचं प्रमाण प्रचंड होतं. पण, आशादायी दृष्टिकोन आणि एकता या दोन घटकांमुळे या विषाणूंशी लढणं सुसह्य झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

​भावना समजून घ्या

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापिका एलिसा एपेल सांगतात की, तणावाखाली असलेल्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मनातील खदखद जाणून घ्या. विशेषतः सणासुदीच्या काळात त्याचं प्रमाण अधिक असेल. त्यांच्यातील तणाव, थकवा, चिंता किंवा अगदी नैराश्य या गोष्टीचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

​सकारात्मक राहण्यासाठी काय करावं?

एपेल सांगतात की, उदासीनता ही जरी नैराश्याच्या जवळ नेणारी प्रक्रिया असली तरी उदासीनता हा काही मानसिक विकार नसून आजूबाजूच्या परिस्थितीनुसार व्यक्त झालेली भावना आहे. करोनाच्या या परिस्थितीत सकारात्मक राहण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊ या…

​स्वतःला कमी लेखू नका

नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. स्वतःशी चांगले वागा आणि मुख्य म्हणजे अशा लोकांमध्ये राहा जिथे तुम्हाला कमी लेखलं जाणार नाही, तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. स्वतःची काळजी घेणं काय असतं याचा विचार करा. कारण, प्रत्येकासाठी ती वेगळी असू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्यासाठी स्वतःची काळजी घेणं म्हणजे पुरेशी झोप काढणं असू शकतं. तर एखाद्यासाठी व्यायाम करणं असू शकतं. खूप वेळ बसून काम करणं टाळा. जेणेकरून, तणाव कमी होण्यास मदत होते. तसंच उत्साही देखील वाटतं. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एखादा फेरफटका मारून येऊ शकता (मास्क घालून).

​सतर्कता आवश्यक

संसर्ग कमी जरी होत असला तरी सुरक्षित अंतर पाळणं आजही तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या बंधनांचा कंटाळा आला म्हणून अनेक लोक करोनाचा संसर्ग कधीच अस्तित्वात नव्हता, असं वागत आहेत. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे, असं एपेल सांगतात.

या काळात सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे थकवा. पण, तुम्ही जर शारीरिक आणि भौतिकदृष्ट्या सक्षम असाल तर बाकीच्या गोष्टींशी लढणं सोपं जातं. तुम्ही जर तयार असाल तर एखाद्या परिस्थितीतवर नियंत्रण मिळवणं कधीही सोपं जातं. पण, काही बाबतीत चिंता ही चांगली बाब असं म्हणायला हरकत नाही.

कारण सद्यस्थितीत वारंवार हात धुणं, मास्क वापरणं अशी स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करतं. सुरक्षित अंतर राखून सगळ्या गोष्टी करणं यामुळे सुरक्षित राहतोच आणि चिंता कमी होण्यास नक्कीच मदत होते.

​नवी शैली आत्मसात करा

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या म्हणण्यानुसार हवामानातील बदलामागचे घटकच भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका वाढवत आहेत. करोनामुळे आपली जीवनशैली पूर्णतः बदलली आहे. अशा प्रकारचं आव्हान देणारी घटना आजतागायत घडली नव्हती हे मात्र खरं. पण अजून सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे, असं एपेल सांगतात. पेला अर्धा रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा पेला अर्धा भरला आहे असं म्हणू या. या काळात न भरून येणारं नुकसान झालं आहे हे जरी खरं असलं तरी भविष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या घटनांसाठीची ही पूर्वतयारी होती असं समजू या

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post