थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी


माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेप्रमाणेच केसांच्याही आरोग्यावर परिणाम होतात. बदलत्या वातावरणामुळे केस निर्जीव, कोरडे होऊ लागतात. वेळीच या समस्यांवर उपाय न केल्यास भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होऊ लागते. तसंच केस तुटणे आणि केसगळतीचीही समस्या निर्माण होते. यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. 

हे नुकसान टाळण्यासाठी नियमित हेअर केअर रुटीन फॉलो करणं आवश्यक आहे. केसांच्या देखभालीसाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नैसर्गिक उपचार करू शकता. महत्त्वाचे म्हणजे केसांचे काळजी घेताना दुसऱ्या व्यक्तीचे हेअर केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये. कारण प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार वेगळा असतो. हिवाळ्यामध्ये केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीने घ्यावी, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती ...

​हेअर पॅक लावणे गरजेचं

थंडीच्या वातावरणात हेअर पॅक लावणं अतिशय आवश्यक आहे. यामुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. आपल्या घरामध्ये काही नैसर्गिक सामग्री सहजरित्या आढळतात. यापासून तुम्ही हेअर पॅक तयार करू शकता. नैसर्गिक हेअर पॅकमुळे टाळूची त्वचा निरोगी राहते आणि केसांना मॉइश्चराइझर देखील मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही कोरफड आणि आयुर्वेदिक तेलापासून तयार केलेल्या हेअर मास्कचाही वापर करू शकता.

​न विसरता केसांना लावा कंडिशनर

आपल्यापैकी बहुतांश जण हेअर वॉशनंतर कंडिशनर लावणे विसरतात किंवा लावतच नाहीत. यामुळे केस अधिक कोरडे होतात. थंडीच्या दिवसांत हेअर वॉश केल्यानंतर न विसरता कंडिशनरचा वापर करावा. यामुळे केस कोरडे होत नाहीत.

​अधिक गरम पाण्याचा वापर करू नये

केस धुण्यासाठी अधिक गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे केसांचे भरपूर नुकसान होते. केस धुण्यासाठी अधिक गरम तसंच अधिक थंड पाणी वापरू नये. केस स्वच्छ धुण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करावा. गरम पाण्यामुळे आपल्या टाळूच्या त्वचेवर वाईट परिणाम होतात. टाळूची त्वचा निरोगी असल्यास केसांशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. पण टाळूची त्वचा कोरडी झाल्यास कोंडा, केसगळती, केस तुटणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

​केसांना तेल लावणे आवश्यक

सुंदर आणि घनदाट केसांसाठी नियमित तेल लावणं आवश्यक आहे. तेलाच्या मदतीने केसांचा मसाज करावा आणि थोड्या वेळासाठी तेल आपल्या केसांमध्ये राहू द्यावे. तेल मसाजमुळे टाळूच्या त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. तसंच केसांशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत मिळते.

​कोंड्यापासून सुटका कशी मिळवावी?

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. ही समस्या दूर करण्यासाठी केसांमध्ये टी - ट्री ऑइल, कोरफड आणि नारळ तेलाचा वापर करावा. या नैसर्गिक उपचारांमुळे कोंडा दूर होण्यास मदत मिळू शकते. केसांमध्ये कोंडा अधिक प्रमाणात होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

​भरपूर पाणी प्यावे

संपूर्ण शरीराची कार्य प्रणाली सुरळीत पार पडण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने केस आणि त्वचेलाही लाभ मिळतात. त्वचेसह केस देखील हायड्रेट राहतात. हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

​हीटिंग टुलचा कमी प्रमाणात वापर

बहुतांश मुली हेअरस्टाइलसाठी हीटिंग टुलचा अधिक प्रमाणात वापर करतात. उदाहरणार्थ हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर इत्यादी. तसंच कलर ट्रीटमेंटमुळेही केसांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हीटिंग टुलचा वापर कमी प्रमाणात करावा

NOTE : केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post