लॉकडाऊन काळातील मद्यविक्री प्रकरणाची कागदपत्रे नष्ट करणार्‍या उत्पादन शुल्कच्या निरीक्षकांवर गुन्हे दाखल करामाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- लॉकडाऊन काळात शहरातील परमिटरुम आणि वाईन शॉपमधून बेकायदेशीर मद्याची विक्री झाल्याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे व अभिलेख नष्ट केले आहेत. तरी कागदपत्रे नष्ट करणार्‍या निरीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संदीप भांबरकर यांनी केली आहे. यासंदर्भात भांबरकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, 27/04/2020 रोजी नगर शहरातील लॉकडाऊनमधील बेकायेशीर परमिटरुम व वाईन शॉपमधून विक्री होणार्‍या दारूविषयी तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रार अर्जावर मी 8/5/2020 रोजी माहिती अधिकारामध्ये अर्ज सादर केला. सदर तक्रार अर्जावर कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करण्यात आली? याविषयी माहितीची मागणी केली. त्या अर्जावर दि. 27/5/2020 रोजी जा.क्र. 112929/185 या पत्रानुसार नगर शहरातील कार्यक्षेत्राची अनुज्ञप्तीची (वाईन शॉप व परमिटरुम) तपासणी केली असता बंद असणार्‍या अनुज्ञप्तीमधून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर मद्य विक्री आढळून आली नाही असे कळवण्यात आले. जी माहिती आपल्या कार्यालयामार्फत देण्यात आली त्याच माहितीवर मी दि. 25/6/2020 रोजी पुन्हा माहिती अधिकारामध्ये अर्ज देऊन तुमच्या मार्फत मी अनुज्ञप्तीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जो पंचनामा, तपासणी दरम्यान स्टॉकची मोजणी, सर्व अनुज्ञप्तीधारकांचे लॉकडाऊन अगोदरचे स्टॉक रजिस्टरची यादी, चौकशी दरम्यान (तपासणी दरम्यान) स्टॉकचे करण्यात आलेले मोजमापाची सर्व कागदपत्रे याची माहितीची मागणी केली असता आपल्या कार्यालयामार्फत 8/7/2020 रोजी जा.क्र. 112020/107/121 या पत्रानुसार सदर माहिती या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याने आपणास पुरविता येत नाही असे कळविण्यात आले. 8/7/2020 रोजी जा.क्र. 112020/107/121 या पत्रानुसार तपासणीसाठी गेलेल्या अधिकारी निरीक्षक सराफ व निरीक्षक बनकर यांची नावे देण्यात आली. मग सदर निरीक्षक हे अनुज्ञप्ती तपासणीसाठी गेले होते की डोकवायला? तरी सदर अनुज्ञप्तीच्या तपासणीसाठी गेलेले निरीक्षक सराफ व निरीक्षक बनकर व त्यांचे कर्मचारी वर्गाने सर्व अनुज्ञप्ती धारकांची तपासणी केली आहे. परंतु निरीक्षक बनकर व त्यांचे कर्मचारी यांचे सर्व अनुज्ञप्ती धारकांबरोबर आर्थिक हितसंबंध आहेत. तरी संबंधित निरीक्षक सराफ व निरीक्षक बनकर व इतर कर्मचारी यांनी सदर सर्व रेकॉर्डवरील कागदपत्रे आपल्या कार्यालयातून नष्ट केलेली आहेत. आपण त्यांच्यावर सरकारी रेकॉर्ड नष्ट करणे म्हणून फौजदारी गुन्हे दाखल करावे. अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात कायदेशीर दाद मागावी लागेल, असा इशारा भांबरकर यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post