टीआरपी घोटाळ्यातील १२ जणांविरोधात आरोपपत्र

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ जणांविरोधात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. अटक आरोपींमध्ये रिपब्लिक वाहिन्यांची पालक कंपनी एआरजी आऊटलायरचे सहायक उपाध्यक्ष घनश्याम सिंह यांचा समावेश आहे.

कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवून घेण्याच्या सूचना कंपनीतील वरिष्ठांनी दिल्याचे तपासावरून स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने आरोपपत्रात केला आहे. ग्राहकांना फितवण्यासोबत सिंह यांनी देशभरातील केबल चालक, मल्टीसिस्टीम ऑपरेटरना हाताशी धरूनही टीआरपी वाढवून घेतल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच १४० साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट आदी पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश आहे.

तपासादरम्यान एआरजी आऊटलायर कंपनीच्या अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप समूहातील संवाद हाती लागले. हे संवाद व चौकशीआधारे अटक आरोपी घनश्याम यांना त्यांच्या वरिष्ठांकडून घोटाळा करून टीआरपी वाढवून घ्यावे, अशा सूचना किंवा आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट होते, असेही आरोपपत्रात नमूद केले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) रिपब्लिक वाहिन्या, केबल चालकांकडे स्पष्टीकरण मागितले होते, असेही आरोपपत्रात नमूद आहे.

प्रिया मुखर्जी यांच्याविरोधात पुरावे

चौकशी टाळणाऱ्या एआरजी आऊटलायर कंपनीच्या सीओओ प्रिया मुखर्जी यांचा बेंगळूरु येथे शोध लागला. त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. मुखर्जी टीआरपी घोटाळ्यातील संशयित आरोपी आहेत. आठ वेळा समन्स, नोटीस जारी करून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशी टाळली.  त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे हाती लागले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post