राज ठाकरेंचा आणखी एक 'कडक' फोटो; सोशल मीडियावर चाललीय 'ही' चर्चा!

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे  यांचा टेनिस कोर्टवरील एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आज राज यांचा आणखी एक 'कडक' फोटो मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोवर लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

राज ठाकरे आणि त्यांचं कृष्णकुंज निवासस्थान गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. कोणताही प्रश्न असला तरी तो फक्त आणि फक्त 'राज'मार्गाने सुटतो, असा दावा हल्ली त्यासाठीच मनसैनिक करताना दिसत आहेत. कोळी बांधव, वारकरी, नाट्यकलावंत, खासगी क्लासचालक अशी अनेक शिष्टमंडळं अलीकडे कृष्णकुंजवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. या शिष्टमंडळांना मोघम आश्वासने न देता राज तिथूनच थेट सरकारमधील संबंधित मंत्र्याशी संवाद साधतात व प्रश्नाची तड लावतात, हा अनुभवही या सर्वांनी घेतला आहे. एकीकडे सत्ता नसताना 'राज'दरबारात गर्दी वाढत असताना व राजकीय आखाड्यात राज यांचा दबदबा कायम असताना दुसरीकडे त्यांनी आपल्या फिटनेसवरही सध्या लक्ष्य केंद्रीत केल्याचं दिसत आहे.

'जो फिट तोच हिट' हे सूत्र राज यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच राजकारणाच्या दगदगीतही ते फिटनेससाठी पुरेसा वेळ देत आहेत. गेले काही दिवस घराशेजारच्याच शिवाजी पार्क जिमखान्यात टेनिस कोर्टवर ते घाम गाळताना दिसत आहेत. राज हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच क्रीडाप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्याचा प्रत्ययही अनेकदा आलेला आहे. आता याच क्रीडाप्रेमातून त्यांनी फिटनेससाठी टेनिसचा मार्ग निवडला आहे. सध्या ते नियमितपणे टेनिस खेळत आहेत. आज मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर राज यांचा एक 'कडक' फोटो पोस्ट केला असून त्यात राज यांच्यातील स्पोर्ट्समनची पुन्हा एकदा झलक दिसली आहे.

आपल्या रुबाबदार बाण्याने सर्वांनाच भुरळ घालणारे राज हे गॉगल घालून ऐटीत खुर्चीत बसले आहेत आणि चहाचे झुरके घेत आहेत, असा हा फोटो आहे. 'शिवाजी पार्क, दादर' असे लोकेशनही त्यात देण्यात आले आहेत. 'स्पोर्ट्समन' राज ठाकरेंचा हा फोटो मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर शेअर केला असून फोटोवर लाइक्सचा पाऊस पडताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी काहीही केलं तरी ते खास आणि लक्षवेधीच असतं, असं त्यांचे विरोधकही मान्य करतात. म्हणूनच राज यांच्यातला राजकारणी आणि खेळाडू या दोन्हीला तितकीच दाद मिळताना दिसत आहे. 'एक असा नेता ज्याला नेमके कुठे जायचे हे माहिती आहे, तो त्या मार्गाने चालला आहे आणि इतरांनाही मार्ग दाखवत आहे', अशी अत्यंत बोलकी कॅचलाइन एका मनसैनिकाने या फोटोला दिली आहे. या सारख्या अनेक कमेंट्स राज यांच्या फोटोवर दिल्या जात आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post