शेतकऱ्यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, बुराडी मैदानाला म्हटले खुला तुरुंग

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी  मागे हटण्यास तयार नाहीत. सरकारने पाठवलेला बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सरकारने आमच्या आंदोलनाचा अपनान केला असल्याचे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बुराडी मैदान हे मैदान नसून खुला तुरुंग असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी दुपारी दोन वाजता बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी सरकारचा बुराडी मैदानात आंदोलन करण्याबाबतचा प्रस्ताव फेटाळून लावला.

आम्ही संपूर्ण व्यवस्थेसह आलो असल्याचे शेतकरी म्हणाले. आमच्याकडे ४ महिने पुरेल इतके रेशन आहे. आम्ही बुराडी मैदानात आंदोलन करणार नाही. आम्हाला रामलीला मैदान किंवा मग जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतील बुराडी मैदानात आंदोलन करावे असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शेतकऱ्यांपुढे ठेवला होता. त्यानंतर सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार आहे, असे अमित शहांनी म्हटले होते. शेतकरी नेत्यांनी अमित शहांचा हा प्रस्ताव मात्र धुडकावून लावला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेसाठी बुराडी मैदानात आंदोलन करण्याची अट घालणे गैर असून त्यांनी अशी अट घालायला नको होती, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. आम्ही अटीविना सरकारशी चर्चा करू इच्छितो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मोर्चा सांभाळत शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता यावर शेतकरी काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post