हाथरस प्रकरण: CBI कडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल

 माय अहमदनगर वेब टीम

लखनौ - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या हाती घेतली आहेत. आता सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी एक समितीही नियुक्त केली आहे. 

दरम्यान, १४ सप्टेंबरला १९ वर्षीय दलित युवतीवर कथितरीत्या चार युवकांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच तिला गंभीर शारीरिक इजा केली होती. त्यानंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात २९ सप्टेंबरला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. चारही आरोपी सध्या अटकेत आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुखांसह अनेक पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. अशातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय तपासाची शिफारस केली होती. त्यानुसार सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतले आहे.

हाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने माहिती दिली आहे. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला असल्याचे सीबीआयनं म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post