महाराष्ट्राला मोठा दिलासा; मृत्यूसंख्येत विक्रमी घट तर, रिकव्हरी रेट वाढला


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला घट्ट बसलेला करोनाचा विळखा आता सैल होताना दिसत आहे. राज्यात गेले काही दिवस ३००च्या घरात करोना मृत्यूंची नोंद होत असताना आज तो आकडा खाली घसरला आहे. राज्यात आज १५८ करोना बाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे तर, १९ हजारांवर अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून करोनानं थैमान मांडलं होतं. करोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळं आरोग्य प्रशासनासमोर रुग्णवाढ रोखण्याचे मोठे आव्हान उभं राहिलं होतं. अखेर आरोग्य प्रशासनाच्या या प्रयत्नाना यश येताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेली आजचे आकडेवारी दिलासादायक आहे. आजही करोना रुग्णांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्या रुग्ण्यांची संख्या अधिक आहे. तर, मृत्यूंसख्येतही घट झाली आहे. आज तब्बल १९ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत १३ लाख १६ हजार ७६९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेटही ८४. ७१ टक्के इतका झाला आहे. 

राज्यातील नवीन करोना रुग्णांच्या आकडाही कमी होताना दिसतोय. आज राज्यात १० हजार ५५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७८,३८,३१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,५४,३८९ (१९.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,८०,९५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post