माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - वर्षभरापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच १८ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सातारामध्ये भर पावसात तुफानी सभा झाली होती. या सभेमुळे राज्याच्या राजकारणातील सर्व गणितं बदलली गेल्याने ही सभा ऐतिहासिक ठरली असल्याचे मत व्यक्त केले जाते.
आज शरद पवारांच्या या सभेच्या वर्षपूर्ती निमित्त राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निमित्त ट्विटद्वारे शरद पवारांचा त्या सभेत भर पावसात बोलतानाचा फोटो शेअर केला आहे. शिवाय, ही सभा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला दिलेला एक संदेश होता… ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही.’ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“१८ ऑक्टोबर हा ऐतिहासिक दिवस असून १ वर्षापूर्वी याच दिवशी साताऱ्याच्या सभेत धो..धो.. पाऊस कोसळत होता व ८० वर्षाचा संघर्षयोद्धा विजेप्रमाणे कडाडत होता.. ही सभा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला दिलेला एक संदेश होता… ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही.’ ” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.
त्यावेळी साधारण पाच ते सहा मिनिटं झालेल्या शरद पवरांच्या भाषणाने गतवर्षी पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्रच पालटले होते.
शरद पवारांच्या या सभेच्या वर्षपूर्ती निमित्त त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांचा तो व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे.
“आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नावरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा….. ” असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Post a Comment