खासदार अमोल कोल्हेंवर गुगलच्या चुकीमुळे शुभेच्छांचा वर्षाव माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे गुगलच्या चुकीमुळे चांगलेच अचंबित झाले. अमोल कोल्हे यांच्यावर सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला हे कळालंच नाही. पण, हे गुगलमुळे झाल्याचं लक्षात आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. “माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल,” असं म्हणत सकाळपासून निर्माण झालेल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना रविवारी गुगलच्या चुकीमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा आणि आश्चर्यही वाटलं. झालं असं की, गुगल सर्चमध्ये अमोल कोल्हे यांचा वाढदिवस १८ ऑक्टोबरला असल्याचे नोंदवलेलं आहे. त्यामुळे आज सकाळपासून अमोल कोल्हे यांच्यावर काही नेत्यांसह चाहते आणि कार्यकत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. या सगळ्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली.

“आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच! वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेज द्वारे, सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे. परंतु Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी नाही पडत. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही! सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल?,” असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीविषयीही कोल्हे यांनी मत व्यक्त केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post