धक्कादायक..! चोरट्यांनी 'गुगल पे'द्वारे घेतले पैसे!



माय अहमदनगर वेब टीम

पुणे:धायरी भागातील चव्हाणबाग परिसरात एका व्यक्तीला अडवून जबरदस्तीने गुगल पेद्वारे त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत केतन पाटील (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. पाटील यांच्या तक्रारीवरून, दुचाकीस्वार तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. हा सगळाच प्रकार धक्कादायक असा आहे. तक्रारदार पाटील हे नोकरी करत असून ते डीएसके विश्व येथे राहण्यास आहेत. सहा ऑक्टोंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते त्यांच्या कारमधून नांदेड सिटीयेथील मित्राला भेटण्यासाठी जात होते. डीएसके विश्व ते नांदेड फाटा रस्त्यावर चव्हाण बाग कॉर्नरपासून पुढे एक किलोमीटर अंतरावर रस्ताच्या मध्यभागी दुचाकी आडव्या लावून तीन व्यक्ती थांबले होते. पाटील हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांची कार थांबविली. त्यावेळी तीन आरोपी त्यांच्या जवळ आले व त्यांनी त्यांच्या कारची चावी जबरदस्तीने काढून घेतली. 

‘तुझी गाडी फोडून टाकीन, तुला माहीत नाही, आम्ही कोण आहोत’, असे धमकावत या तिघांनी पाटील यांच्याकडे पैशांची मागणी केली. तक्रारदार पाटील यांच्याकडे पैसे नसल्यामुळे आरोपींनी चक्क गुगल पे वरून पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदार पाटील यांना जबरदस्तीने तीन हजार रुपये गुगल पे वरून एका क्रमांकावर पाठविण्यास भाग पाडले. पैसे मिळाल्यानंतर त्यांनी पाटील यांना कारची चावी दिली. त्यानंतर ते आरोपी पसार झाले. तक्रारदार हे कामात असल्यामुळे त्यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानंतर अज्ञात तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक सतीश उमरे हे अधिक तपास करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post