'या' शहरात साकारलं पहिलं लेडीज स्पेशल कोविड सेंटर!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ट्रेन, बस, स्वच्छतागृह, वसतीगृह अशा ‘फक्त महिलांसाठी’च्या यादीत आता कोविड केअर सेंटरचीही भर पडली आहे. नगरमध्ये काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत ७८ बेडचे महिला स्पेशल कोविड सेंटर उभारले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले. 

नगर शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाणही मोठे आहे. जनरल कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना महिलांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हे फक्त महिलांसाठीचे गुरू अर्जुन कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. नगरमध्ये सुदैवाने काही अनुचित प्रकार घडला नसला तरी अन्य ठिकाणी कोविड सेंटरमध्ये महिलांची छेडछाड आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांसाठीचे हे कोविड सेंटर वेगळे ठरते. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

येथे महिलांना घरगुती वातावरणात उपचार मिळतील. याशिवाय त्यांना खेळण्यासाठी विविध गेम्स व साहित्य उपलब्ध असेल. कोविड काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या घर घर लंगर सेवा या संस्थेच्या पुढाकारातून हे केंद्र उभारण्यात आले. त्यासाठी जिल्हा पोलीस दल, आय लव्ह नगर संस्था, शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट, जैन ओसवाल ट्रस्ट आणि महानगरपालिका यांनी सहकार्य केले आहे. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलीसप्रमुख अखिलेशकुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह घर घर लंगर सेवा ग्रुपचे सदस्य हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, प्रिथपाल सिंह धुप्पर, किशोर मुनोत, राहुल बजाज यांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post