डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोना; कार्यालये झाली 'हॉटस्पॉट'
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडीच्या ४३पैकी डझनभराहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता अनेक मंत्र्यांच्या कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांची कार्यालये ही करोनाची 'हॉटस्पॉट' झाल्याचे बोलले जात आहे. 

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित झाले होते. यामुळे या मंत्र्यांची कार्यालये काही दिवस बंद होती. यातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरील बंधने उठविण्यात आली असून, आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा वावर वाढल्याने मंत्री कार्यालयात गर्दी होत आहे. 

मंत्रालयात नागरिक आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी आहे. पण आमदारांसोबत १५-२० कार्यकर्त्यांचा घोळका मंत्रालयात फिरताना दिसतो. आमदारांसोबत हे कार्यकर्तेही मंत्र्यांच्या दालनात शिरतात. मंत्र्यांची सही घेण्यासाठी आमदार मंत्र्याच्या दालनात जातात, त्या पाठोपाठ कार्यकर्तेही घुसतात. त्यामुळे मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग  वाढत आहे. त्यामुळे हा धोका असल्याने मंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी मंत्रालयात फिरकत नाहीत. मंत्रालयात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सातव्या मजल्यावर होती. तेव्हा अधिकारी, कर्मचारी, पोलिस, आमदार, कार्यकर्ते आणि पोलिस यांची गर्दी होती. 

मंत्रालयाच्या विभागांतही शिरकाव

मंत्री कार्यालयच नव्हे तर मंत्रालयाच्या विभागांत करोनाचा शिरकाव झाला आहे. उद्योग विभागाने आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी करून घेतली. अनेक सनदी अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनाही लागण झाली आहे. सनदी अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीतही करोनाने शिरकाव केलेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही करोनाची लागण झाली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post