खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर...??? स्थानिक नेत्यांचा वेगळा सूर,

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यास पक्षाला कोणत्या मतदारसंघात काय फायदा होऊ शकतो, याचा आढावा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत घेतला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले हाेते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत खडसे यांच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी बैठकीनंतर केला. वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर पहिल्यांदाच थेट आरोप केले. त्यावेळपासून खडसे पक्ष सोडतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील या चर्चांना पुन्हा सुरूवात झाली आहे. मात्र, खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यापूर्वी पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेण्याचा सल्ला शरद पवार यांनी जयंत पाटील यांना दिला. त्यानुसार मंगळवारी ते जळगावला येऊन प्रमुख स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार होते. मात्र, माध्यमांमध्ये ती चर्चा झाल्यानंतर या नेत्यांना आधी नाशिकला आणि तिथून मुंबईत बोलावण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीतच ही चर्चा झाली. चर्चा झाल्याच्या वृत्ताला नकार


दरम्यान, या बैठकीत खडसे यांच्या प्रवेशाच्या अनुशंगाने कोणतीही चर्चा झाली नाही. खडसे यांचा प्रश्न त्यांचा पक्ष सोडवेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. त्याच पद्धतीची विधाने पक्षाचे प्रतोद आणि अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी आणि माजीमंत्री गुलाबराव पाटील यांनीही केली. या बैठकीनंतर कोणीही माध्यमांना काहीही माहिती देऊ नये, असे बैठकीत सांगण्यात आले असल्याचे नेत्यांनी अनौपचारीकपणे सांगितले.


सत्तेवर असताना त्रास दिल्यामुळे दोन माजी राज्यमंत्र्यांची नकारात्मक मते


चर्चेत जिल्ह्यातील दोन माजी राज्यमंत्र्यांनी खडसे यांना पक्षात घेण्याबाबत नकारात्मक मते नोंदवल्याचेही सांगण्यात येते आहे. खडसे यांनी सत्तेत असताना कसा विरोध केला, कामे कशी होऊ दिली नाहीत आणि कशा केसेस दाखल केल्या हे सांगण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला. त्यावर खडसे हे त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम करणारच. आपल्याकडे सत्ता असताना आपणही आपला पक्ष वाढवण्यासाठीच प्रयत्न करतो, असे सांगत शरद पवार यांनी या नेत्यांशी त्याबाबतीत असहमती व्यक्त केली, असेही सूत्रांनी सांगितले. आम्हाला ताकद द्या, आम्ही पक्ष वाढवतो, असे विधान एका माजी राज्यमंत्र्यांनी केले. त्यावर, मंत्रीपदे देऊनही जिल्ह्यातील आमदारांची संख्या ६ वरून १ वर कशी आली? असा सवाल पवारांनी केला.


खडसेंकडूनच आला प्रस्ताव


या बैठकीच्या प्रारंभी शरद पवार यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आला आहे आणि त्यावर निर्णय घेण्यापूर्वी तुमची मते मला जाणून घ्यायची आहेत, असे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याची आपण चाचपणी करीत असून त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. या वेळी विधानसभेत असलेली ५४ ही संख्या पुढच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत वाढवायची आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


जिल्ह्यातील दोन्ही खासदार मिळतील


दोघा-तिघांचा अपवाद वगळला तर इतरांनी खडसे यांचा पक्षाला फायदाच होईल, अशी मते व्यक्त केल्याचेही सांगण्यात येते आहे. खडसे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. शिवाय जळगाव मतदारसंघातही ते उमेदवार निवडून आणू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही खासदार राष्ट्रवादीला मिळू शकतात. याशिवाय जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघांतही खडसे यांचा पक्षाला लाभ होऊ शकतो, असेही या वेळी सांगण्यात आले. खडसेंचा प्रभाव असलेला लेवा पाटीदार समाज कोणत्या मतदारसंघात किती आहे, याचाही आढावा पवार यांनी घेतला.


रक्षा खडसे यांनी राजीनामा द्यावा


एका नेत्याने खडसे यांना पक्षात घ्यायचे असल्यास त्यांच्या स्नुषा भाजप खासदार रक्षा खडसे यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला सांगावे, अशी सूचना मांडली. मात्र, त्यावर पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. खडसे यांना किमान वर्षभर पक्षसंघटनेतच काम करायला सांगण्यात यावे, अशीही सूचना बैठकीत आली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post