सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. गेले दोन दिवस मुंबईकरांना ऊन्हाचे वाढीव चटके बसले असले असून, पुढील दोन ते तीन दिवस ‘ताप’दायक वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबईकरांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला असून, मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

राज्यासह मुंबईत धो धो कोसळलेला मान्सून आता ब-यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही ठिकाणी मान्सून कोसळत असून, मुंबईत मात्र त्याने ब-यापैकी विश्रांती घेतली आहे. विशेषत: शुक्रवारीच मुंबईकरांना चढत्या पा-याचा किंचित अनुभव आला होता.

शनिवार आणि रविवारीही त्यात भर पडली; आणि हवामान खात्यानेदेखील तापमानात वाढ नोंदविली. विशेषत: शनिवार आणि रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईकरांना ऊन्हाचे चटके बसू लागले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तर अक्षरश: शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या. एक तर कोरोना आणि त्यात हा ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईकरांना कोंडीत पकडले होते.

मुंबईमध्ये सध्या तापमान वाढ जाणवत आहे. उकाडा पण जास्त आहे. गेल्या ४, ५ दिवसात कमी पाऊस, दिवसा ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊस असून, त्याचा एकत्रित परिणाम जाणवत आहे. वातावरणातील या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वातावरण असेच पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post