....म्हणून यंदा राज्यात महापुराची शक्यता कमीच

संग्रहित

माय अहमदनगर वेब टीम
पुणे - भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी पावसाचा तिसरा अंदाज जाहीर केला. मात्र तो निराशाजनक आहे. जून, जुलैसारखाच सर्वसामान्य पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पडेल असा आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीसारखा पूर येण्याची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने 94 ते 106 टक्के इतका पाऊस या दोन महिन्यांत होईल, असे जाहीर केले आहे. त्यातही 8 टक्के कमी-जास्त पाऊस राहील, असेही म्हटले आहे.

राज्यात मागील वर्षी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तर मिटला होताच; शिवाय राज्यातील बहुतांशी भागातील नद्यांना महापूर आले होते. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हा भाग पाण्याखाली होता. त्यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण अगदी जून महिन्यापासूनच साधारण आहे. त्यातच शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा म्हणजेच मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला आहे. तोसुद्धा साधारणच आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच मदार आहे.

राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.  राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नगर या भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post