तेल, टूथपेस्ट, साबण स्वस्त होणार

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - गृहपयोगी वस्तू असलेल्या तेल, टूथपेस्ट आणि साबणावरील कर कमी करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर आधी २९.३ टक्के इतका वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागत होता. मात्र आता त्यांच्यावर १८ टक्के जीएसटी लागेल. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

वस्तू आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) हळूहळू स्थिरावू लागली असून त्यातून मिळणा-या महसुलात सातत्य आले आहे. त्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. सरकारने माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून निवडक वस्तूंवरील कर कमी केला आहे. यात बहुतांश दैनंदिन वापरातील वस्तू आहेत. केंद्र सरकारच्या कर कपातीमुळे साखर, मिठाई, राईचा सॉस, केचअप, साबण, दंतमंजन, मिनरल वॉटर, अगरबत्ती, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, १००० रुपयांपर्यंतचे फुटवेअर, रंग या वस्तूंच्या जीएसटी दरात कपात केली आहे

देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. ही कर प्रणाली लागू झाल्यापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटलं आहे. आता केवळ लक्झरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. तर १३१ कोटी ई वे बिल तयार झाली असल्याचे सरकारने म्हटलं आहे

अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातला सावरण्यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी ५ टक्के जीएसटी असून परवडणा-या घरांसाठी तो केवळ १ टक्का आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची घडी बसवण्यापासून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात दिवंगत अरुण जेटली यांचे मोलाचे योगदान आहे. देशातील कर प्रणालीत ऐतिहासिक सुधारणा म्हणून त्याची नोंद होईल, असे ट्विट करून अर्थ खात्याने जेटली यांना आदरांजली वाहिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post