शिक्षकांची औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी


 माय अहमदनगर वेब टीम

नाशिक- विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी अन्नत्याग करून आैरंगाबाद ते मुंबई (मंत्रालय) असा पायी दिंडीचा प्रवास सुरू केला आहे. यासह अन्य मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठीही ही पायी दिंडी काढण्यात आली आहे.

गजानन खैरे, पानसरे, कुरेशी व निकम हे शिक्षक बंधू अन्नत्याग करून सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी दिंडी करत आहेत. हजारो विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न त्यांच्याकडे असून जीवाची पर्वा न करता हे शिक्षक लढाई लढत आहेत. संभाजी ब्रिगेड त्यांच्या लढाईत सहभागी आहे.

शिक्षकांच्या जीविताला धाेका झाल्यास त्याला शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री व शिक्षणाधिकारी सर्वस्वी जबाबदार असतील, असे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी स्पष्ट केले. या आंदोलनकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याने सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तात्काळ निधी वितरण करून सरकारने शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, बापू मूरकुटे, राजेंद्र शेळके, विकी ढोले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

विविध संघटनांची भेट

हे शिक्षक शनिवारी नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांना आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये दाखल झालेले शिक्षक गजानन खैरे यांच्यासह सहभागी झालेल्या शिक्षकांची भेट घेतली.

दिंडीचा बारावा दिवस

गजानन खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७ जुलै २०२० पासून औरंगाबाद येथून पायी दिंडीस सुरवात केली आहे. या दिंडीचा शनिवारी बारावा दिवस उजाडला. या आंदोलन कर्त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली असल्या कारणाने सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post