लॉकडाऊन काळात १५ हजार गुन्हे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर केलेले असताना, जिल्ह्यात या कालावधीत तब्बल 15 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे नगर शहरात दाखल झाले आहेत, हे विशेष. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नियम मोडणारे यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

कोरोनामुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. सुरूवातीच्या काळात प्रशासकीय यंत्रणांकडून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली.मात्र, तीन महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. लॉकडाऊन करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्वसामान्यांच्या मुक्त वावरावर अनेक बंधने घातली होती. जिल्हाधिकार्‍यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला दिले होते. त्यानुसार विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


 
जिल्हाभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम 188 नुसार दाखल केलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केला, म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीला 1 महिना तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल तर सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे 188 अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

परवानगी नसताना संचार करणे, मास्क न लावणे, विनापरवाना वाहतूक करणे, परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणे, अशा विविध प्रकारच्या कारणांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने, पोलिसांसमोर आता या गुन्ह्याचे आरोपपत्र (चार्जशीट) तयार करून ते न्यायालयात वेळेवर सादर करण्याचे आव्हान आहे. तर नियम मोडणार्‍या नगरकरांना या गुन्ह्यांमुळे चांगलीच अद्दल घडणार आहे.

पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे

कोतवाली 4482, तोफखाना 5284, भिंगार कॅम्प 1279, पारनेर 178, नगर तालुका 105, सुपा 45, एमआयडीसी 183, कर्जत 81, श्रीगोंदा 138, बेलवंडी 65, जामखेड 104, शेवगाव 114, पाथर्डी 93, नेवासा 75, शिंगणापूर 28, सोनई 96, शिर्डी 75, राहाता 64, लोणी 153, कोपरगाव तालुका 59, कोपरगाव शहर 142,, श्रीरामपूर शहर 688, श्रीरामपूर तालुका 57, राहुरी 242, संगमनेर शहर 842, संगमनेर तालुका 144, राजूर 91, अकोले 69, घारगाव 38, आश्वी 44, एकूण 15 हजार 58.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post