केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोना; मुख्यमंत्र्यांनी केलं ट्विटमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. भारतात रुग्णसंख्येनं तब्बल १७ लाखांचा आकडा पार केला आहे. सर्वसामान्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही करोनानं गाठलं आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षण आढळल्यानंतर त्यांनी करोना टेस्ट केली होती. त्या करोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचं कळताच राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांनीच त्यांना लवकरच बरे वाटेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत अमित शहा लवकरच बरे होऊन येतील व तेवढ्याच जोमानं कामालाही लागतील, असे म्हटलं आहे. 

अमित भाई, तुम्ही लवकर बरे होऊन याल व नेहमीप्रमाणे त्याच जोमानं या करोनाच्या परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन कराल, अशी आशा करतो, असं ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शहा तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे व्हाल, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं आहे. 

तुम्ही लवकरच करोनावर मात कराल, यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करू, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमित शहा तुम्ही लवकरात लवकर स्वस्थ होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल, अशी इच्छा व्यक्त करतो. माझ्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत, अशी कळकळ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा कार्यरत व्हा, अशी इच्छा व्यक्त करतो. माझे श्रद्धास्थान रामेश्वराच्या चरणी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post