पद्म पुरस्काराच्या समितीची आ. नितेश राणेंकडून खिल्ली

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी राज्य सरकारतर्फे समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करुन, ‘आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही’, असे म्हटले. ‘नाईट लाईफ गँगसोबत दिनो एम. चं मोठं योगदान आहे, तरीही त्याला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, अशी आशा करुयात. वेट अँड वॉच,’ असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणा-या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने ही समिती स्थापन केली आहे. या समितीत ५ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा ९ जणांचा समावेश आहे.

यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची ही या समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post