जिल्हा सामान्य रुग्णालयातील २५ बेडस् आयसीयू विभागाचे लोकार्पण

*अधिक चाचण्यांमुळे रुग्णांपर्यंत पोहोचून वेळेत उपचार शक्य*

*'चेस दी वायरस' संकल्पना राबविण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
*अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ*

*मिशन झिरो उपक्रमाचा आजपासून शुभारंभ*

*कोरोना टेस्ट लॅबच्या वाढीव चाचणी क्षमतेचा शुभारंभ*
           माय अहमदनगर वेब टीम
          अहमदनगर - कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. अहमदनगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. 'चेस दी व्हायरस' याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. राज्य शासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद म्हणून आरोग्य सेवेसाठी स्वयंसेवी संस्था पुढे येतात ही खूप महत्वाची बाब आहे. समाजाप्रती काही देणे लागतो हा विचार महत्वाचा आहे, हे या कृतीतून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.  

 

          येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन आणि  शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयात  कार्यान्वित करण्यात आलेला  पंचवीस बेडचे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आयसीयु विभाग, भारतीय जैन संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेला मिशन झीरो उपक्रम' आणि जिल्हा रुग्णालय येथील आरटीपीसीआर लॅबच्या चाचण्यांच्या समवेत क्षमतेत वाढ करण्याच्या कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई- प्रणाली द्वारे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आधी मान्यवर या कार्यक्रमात  ई-प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धूत चॅरिटेबल ट्रस्टचे अनुराग धूत, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आदींची उपस्थिती होती.

          कार्यक्रमाच्या सुरुवातीलाचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वांना बकरी ईद आणि महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

          ते म्हणाले, आपण कोरोना विरुद्धच्या लढाईला एकत्रितपणे सामोरे जात आहोत. आपण जे काम करतोय ते जनतेच्या हितासाठी करतोय. त्याचमुळे त्याला चहूबाजूंनी सहकार्य मिळत आहे. यामुळे कामाचा वेग वाढला आहे. अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे वेळीच लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना शोधून त्यांच्यावर आपण उपचार करत आहोत. चाचण्यांची संख्या वाढत आहेय  राज्यात प्रयोगशाळांची संख्या आता वाढली आहे. आपण हे सर्व प्रयत्न करतो आहोत. याला सामाजिक संस्था पुढे येऊन सहकार्य करीत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.

          लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. सदैव सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ही शिथिलता दिल्यानंतर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासंदर्भातील आग्रह धरला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांची यामध्ये मोठी भूमिका आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आपण यश मिळवले. इतर आजार असणार्‍या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आपण 'मिशन झीरो' अंतर्गत 'चेस द व्हायरस' असे केले पाहिजे. जिल्ह्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला आहे. या टास्क फोर्सने त्याचे काम सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

          महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे  प्रचंड काम करत आहेत. धारावी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. जिल्हयात चाचण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या जरी वाढणार असली तरी, त्यास उपचार वेळेत करणे शक्य होणार आहे. मात्र, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

          आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात कोरोना चाचणी करणार्‍या २११ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याकडे केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. आरोग्य सेवांचे बळकटीकरण आपण करत आहोत. आरोग्य सेवेत मनुष्यबळ भरती करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत २१ लाखाच्या वर चाचण्या आपण केल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून २५ अहमदनगर मध्ये २५ खाटांचे अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आयसीयू विभाग कार्यान्वित झाला आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या पुढाकारातून लॅबची क्षमता वाढवली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरचे काम उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. खाजगी हॉस्पीटल जादा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी राज्याच्या काही भागातून येत आहेत. जिल्ह्यातही असे प्रकार सुरु असतील तर त्याचे ऑडिट करा. सामान्य नागरिक हाच आपला केंद्रबिंदू आहे. त्याला त्रास होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

          पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, राज्यात सर्वप्रथम आरटीपीसीआर लॅब सुरु होणारे अहमदनगर हे पहिले जिल्हा रुग्णालय ठरले. आता तेथील चाचण्यांची क्षमताही वाढत आहे. कोरोनाच संकट अचानक आपल्या राज्यावर आले. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्राम समित्यांनी चांगले काम केले आहे. सामाजिक संस्थांचा त्यांना सहभाग मिळाला. मात्र, आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापर वाढला पाहिजे. मिशन झीरो यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे सांगितले.

          सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आभार डॉ. पोखर्णा यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post