इतिहासात प्रथमच भरले 'हे' धरण


माय अहमदनगर वेब टीम
कोंभळी - कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना मध्यम प्रकल्प शनिवारी (दि.1) रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टच्या सुरुवातीला सीना धरण भरले आहे. नगर जिल्ह्यातील पहिले धरण भरण्याचा मान यंदा सीना धरणाला मिळाला आहे.

सीना धरणाची क्षमता 2 हजार 400 दशलक्ष घनफूट इतकी आहे. हे धरण बांधल्यापासून खूपच कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे ते कधीच जुलैअखेरीस भरत नाही. परंतु, यंदा जिल्ह्याच्या पूर्व व मध्य भागासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रथमच 


 
जुलैअखेरीस सीना धरण भरले आहे. त्यामुळे जिरायत भागातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सर्वांत आधी भरणारी जिल्ह्यातील निळवंडे, मुळा, भंडारदरा ही धरणे अद्याप भरलेली नाहीत. घाटमाथ्यावर अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने या तीनही मोठ्या धरणांचा पाणीसाठा फारसा वाढलेला नाही.  

नगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, पिंपळगाव माळवी, नगर आदी ठिकाणी झालेल्या पावसावरच सीना धरणाची भिस्त आहे. गेल्या महिन्यात सीना धरणाचे पोट खपाटीला गेले होते. मात्र, या वर्षीच्या पावसाळ्यात सर्वच नक्षत्रांत चांगला पाऊस झाला. नगरहून सीना अनेकदा वाहती झाली. या धरणाचा फायदा कर्जत, श्रीगोंदे आणि आष्टी तालुक्याला होतो. धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. धरण भरल्यानंतर रविवारी (दि.2) निमगाव गांगर्डा येथील शेतकर्‍यांनी जलपूजन केले. यावेळी ज्येष्ठ नेते आनंदराव गांगर्डे, कर्जत पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, निमगावचे सरपंच भागचंद पांडुळे, शरद गांगर्डे, महेश राऊत, गुलाबराव साठे, भीमाबाई गोरे, बिजाबाई गांगर्डे, प्रभाकर सायंबर, बबन गांगर्डे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

2017 नंतर पहिल्यांदाच धरण भरले

सीना धरण सन 2017 नंतर सन 2020 मध्ये पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर धरण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला त्याचा मोठा लाभ होणार आहे. जिरायती भाग असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बाबासाहेब गांगर्डे, पंचायत समिती सदस्य

8 हजार 335 हेक्टरला लाभ

सीना धरण इतिहासात प्रथमच जुलै अखेरीस भरले आहे. धरणाचे लाभक्षेत्र 8 हजार 445 हेक्टर इतके आहे. त्यापैकी उजव्या कालव्यावर 7 हजार 672, तर डाव्या कालव्यावर 773 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. उजव्या कालव्याचा कर्जत, तर डाव्या कालव्याचा आष्टी तालुक्याला लाभ होतो. 
बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post