पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, असे भाकीत करत या राजकीय घडामोडी आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल असे भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

संजय काकडे म्हणाले, “महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील ३ महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.

“सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच आता आम्हाला सावध राहण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, महाविकासआघाडीने आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत राजकीय घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी (23 जुलै) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली होती. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post