तब्बल २० वर्षांनी व्हेनिस महोत्सवात 'या' मराठी चित्रपटाची निवड


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असते की आपल्या एखाद्या तरी चित्रपटाची निवड ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्हावी. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो दिग्दर्शक अथक प्रयत्न करतो असतो. अशाच एका दिग्दर्शकाच्या प्रयत्नाला यश आले आहे. १९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. याची माहिती चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वांत जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. यंदा ७७ वा महोत्सव साजरा होत आहे. यंदाच्या या महोत्सवास दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी आहे.  त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

१९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. यापूर्वी व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली संत तुकाराम या भारतीय चित्रपटाला जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्य आणि टीम''.  

हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते १२ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हा पहिला महोत्सव आहे ज्यात कोरोना महामारीच्या काळातसुद्धा प्रेक्षकांसह अनेक दिग्गजांना उपस्थिती लावण्यात येणार आहे. 

‘द डिसायपल’ या चित्रपटात आदित्य मोडक, अरुण द्रविड, सुमित्रा भावे आणि किरण यज्ञोपवीत मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता विवेक गोम्बर यांनी त्याच्या झू एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे, अशी माहिती चैतन्य ताम्हाणे यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post