शेवटी 'तो' राहणार वाघिणी सोबत...



माय अहमदनगर वेब टीम
बुलडाणा - स्वतंत्र अधिवास आणि वाघिणीची साथ शोधण्यासाठी ५ महिन्यात महाराष्ट्र व तेलंगणा ह्या दोन राज्यातील आठ जिल्हे व चार अभयारण्यातून तब्बल १३०० कि.मी.ची भ्रमंती केलेल्या सी-१ या वाघाचा एकांतवास लवकरच संपणार आहे. त्याच्या सोबतीला वाघीण उपलब्ध करुन देण्याचे संकेत व्याघ्र संरक्षण समितीच्या बैठकीतून मिळाले आहेत. नुकतेच २८ जुलैला अमरावती येथे समितीची बैठक झाली. यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालक एस.एस.रेड्डी, भारतीय वन्यजीव संस्थेचे विशेषज्ञ बिलाल हबीब प्रामुख्याने उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यात टी-वन या वाघिणीने २०१६ मधे तीन बछ्ड्यांना जन्म दिला होता. त्यांचे सी-१, सी- २ आणि  सी-३ असे नामकरण करण्यात आले होते. या तीघांचेही परिभ्रमण तपासण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यापैकी सी-१ हा तीन वर्षीय सबअडल्ट वाघ टीपेश्वर मधून बाहेर पडून पांढरकवडा, नांदेड, किनवट, पैनगंगा, इसापूर, पुसद, हिंगोली, वाशिम, अकोला अशी भ्रमंती करीत १ डिसेंबर २०१९ ला बुलढाणा शहरालगतच्या ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात आला. तेथून त्याच महिन्यात तो अजिंठा पर्वतरांगा ओलांडत औरंगाबाद, जळगाव भागातून गौताळा औट्रमघाट अभयारण्यापर्यंत अनुकूल अधिवास व वाघिणीच्या शोधात भटकला. जानेवारी २०२० मध्ये हा सी-१ वाघ शेवटी ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात परतला व तेथेच स्थिरावला. या वाघाला सोबतीण मिळवून देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. अन्य अभयारण्यातून ज्ञानगंगामध्ये वाघीण आणण्याबाबत समितीचे एकमत झाले आहे. सी-१ वाघाला जोडीदार उपलब्ध झाल्यानंतर आपसूकच येथे भविष्यात वाघांची संख्या वाढेल.

त्याआधी तीन उपाययोजना ६ महिन्याच्या आत करण्याचे समितीने सुचविले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणारा बुलडाणा - खामगाव मार्ग पूर्णपणे बंद करणे, वनक्षेत्रातील चराई बंद करणे आणि देव्हारी गावाचे अन्यत्र पुनर्वसन करणे आवश्यक झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post